भाजपचे गोव्यात डबल इंजिन शक्य

वाढलेले मतदान भाजपलाच फायद्याचे ठरण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:12 am
भाजपचे गोव्यात डबल इंजिन शक्य

पणजी : लोकसभेची उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याची जागाही यावेळी भाजपच्या पारड्यात पडण्याचे राजकीय अंदाज व्यक्त होत आहेत. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची उणीव होती. भाजपकडे सक्रीय कार्यकर्त्यांची फळी होती. शिवाय उत्तर गोव्यात पर्ये, साखळी, वाळपई, मये आणि डिचोलीतील भरघोस मतदान श्रीपाद नाईक यांना, तर सांगे, सावर्डे, काणकोण, शिरोडा या मतदारसंघांत वाढलेले मतदान पल्लवी धेंपो यांच्या फायद्याचे ठरू शकते. दोन्ही मतदारसंघांत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सही (आरजीपी) मोठ्या प्रमाणात मते मिळवू शकतो.

उत्तर गोव्यात यावेळी श्रीपाद नाईक, काँग्रेसचे अॅड. रमाकांत खलप आणि आरजीपीचे मनोज परब यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. त्यामुळे उत्तरेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. उत्तर गोव्यात यावेळी ७७.६९ टक्के मतदान झाले आहे. हळदोणा आणि सांतआंद्रे हे दोन मतदारसंघ वगळल्यास इतर १८ पैकी १७ आमदार भाजपचे आणि एक आमदार मगोचा आहे. भाजपची​ मगोशी युती असल्यामुळे या अठरापैकी बहुतेक मतदारसंघांमध्ये श्रीपाद नाईक यांनाच अधिक मते पडण्याची शक्यता आहे. 

यावेळी उत्तर गोव्यातील पर्ये, साखळी, वाळपई, मये आणि डिचोली या पाच मतदारसंघांतील १,३१,०३७ मतदारांनी मतदान केलेले आहे. हे पाचही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्यामुw ळे तेथूनच श्रीपाद नाईक यांना अधिक मतांची आघाडी मिळेल, असे भाजपला वाटते. श्रीपाद नाईक यांच्याबाबतची निराशा मतदारांनी प्रचार काळात व्यक्त केली असली, तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह उत्तर गोव्यातील मंत्री आणि सर्वच आमदारांनी सर्व शक्ती पणाला लावली. त्याचा फायदा श्रीपाद नाईक यांना मिळणार आहे. 


२०१९ च्या निवडणुकीत उत्तर गोव्यातील २० पैकी १६ मतदारसंघांमध्ये श्रीपाद नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, कळंगुट, ताळगाव, सांताक्रूज​ आणि सांतआंद्रे या चार मतदारसंघांमध्ये मात्र काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांना आघाडी मिळाली होती. या चारपैकी कळंगुट वगळता इतर तीन मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसकडे होते. यावेळी यापैकी तीन मतदारसंघ भाजपकडे असल्याने त्याचा फायदा श्रीपाद नाईक यांना मिळू शकेल. पण कळंगुट, पणजी, सांताक्रुझ, ताळगाैव या मतदारसंघांमध्ये खलप यांनाही मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात.

दक्षिण गोव्यात यावेळी ७४.४७ टक्के मतदान झालेले आहे. या मतदारसंघातील २० पैकी १२ मतदारसंघ भाजपकडे आहेत. शिवाय मगोचा एक आमदार आणि दोन अपक्ष भाजपसोबत आहेत.

भाजपकडे असलेल्या बारा मतदारसंघांत २,७२,०९५, दोन अपक्षांच्या मतदारसंघांत ४४,९३१ आणि मगोकडे असलेल्या मडकई मतदारसंघात २२,३०४ अशी मिळून या १५ मतदारसंघांत ३,३९,३३० मतदान झालेले आहे. त्यात सांगे, सावर्डे आणि काणकोण या तीन मतदारसंघांत भरघोस ७३,८३३ मतदान झालेले असल्याने आणि हे तिन्ही मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे पल्लवी धेंपो यांना या तीन मतदारसंघांतून मोठी आघाडी मिळणार आहे. दक्षिण गोव्यातील निवडणुकीत ख्रिस्ती धर्मियांचा प्रभाव असलेला सासष्टी तालुका नेहमीच केंद्रस्थानी असतो. तेथील आठपैकी तीन मतदारसंघ यावेळी भाजपकडे असल्यामुळे सासष्टीतील अधिकाधिक मते खेचण्यात भाजपला यावेळी यश मिळण्याची शक्यता आहे.