‘पनीर तिक्का’ऐवजी दिले ‘चिकन सँडविच’; तरुणीने रेस्टॉरंटकडे मागितली ५० लाखांची भरपाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 10:24 am
‘पनीर तिक्का’ऐवजी दिले ‘चिकन सँडविच’; तरुणीने रेस्टॉरंटकडे मागितली ५० लाखांची भरपाई

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील चामुंडानगरमध्ये एका रेस्टॉरंटमधून ग्राहकाला पनीर तिक्का सँडविचऐवजी ‘चिकन सँडविच’ देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. निराली परमाप नावाच्या तरुणीने एका रेस्टॉरंटमधून पनीर सँडविचची ऑर्डर दिली होती. पण तिला चिकन सँडविचची डिलिव्हरी मिळाली. सँडविच खायला सुरुवात केल्यानंतर ते नॉनव्हेज सँडविच असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने अहमदाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करत ५० लाखांची भरपाई मागितली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिलेल्या तक्रारीत निराली यांनी संपूर्ण प्रकार नमूद केला आहे. ती ३ मे रोजी सायन्स सिटी येथील तिच्या कार्यालयात होती. तिथून तिने पनीर तिक्का सँडविचची ऑर्डर दिली होती. मात्र, रेस्टॉरंटने तिला ‘चिकन सँडविच’ पाठवून दिले. सुरुवातीला निरालीला हे समजू शकले नाही. निरालीने सँडविच खायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आले की चीज खूप घट्ट आहे. तिचा संशय बळावला. तेव्हा निरालीने सँडविचचे पाव बाजूला करून पाहिले असता, त्यात चिकनचे तुकडे होते. मात्र, निरालीला हे सर्व समजण्यापूर्वीच तिने चिकन सँडविचचा काही भाग खाल्ला होता.

५० लाख नुकसान भरपाईची मागणी

निरालीने तक्रारीत म्हटले आहे की, ती शाकाहारी आहे. त्याने आयुष्यात कधीच मांसाहार केला नाही. निरालीने रेस्टॉरंटवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले असून ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत अहमदाबाद महानगरपालिकेच्या अन्न विभागाच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. तरुणीला शाकाहार ऐवजी मांसाहारी पदार्थ दिले गेल्याची तक्रार आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चूक आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.