लोकशाहीच्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढला

पुरुषांच्या टक्केवारीत तिसऱ्या वर्षीही घट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:07 am
लोकशाहीच्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढला

पणजी : लोकसभा निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी पुरुष मतदारांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. यंदा ५१.९३ टक्के महिलांनी तर ४८.०६ टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा झालेली महिला मतदानाची टक्केवारी ही आतापर्यंतची विक्रमी टक्केवारी ठरली आहे. तर २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत पुरुष मतदानाची टक्केवारी घटली आहे.


निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडवारीनुसार यावर्षी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मतदासंघांत मिळून एकूण ८ लाख ९६ हजार ९५८ मतदान झाले. यामध्ये ४ लाख ६५ हजार ८६२ महिला तर ४ लाख ३१ हजार ८७ पुरुष मतदान झाले. एकूण मतदानात महिलांचे मतदान ५१.९३ टक्के व पुरुषांचे ४८.०३ टक्के होते. यावर्षी एकूण ७६.०६ टक्के मतदान झाले.

२०१४ मध्ये राज्यात लोकसभेसाठी ८ लाख १७ हजार ४४० मतदान झाले होते. यातील ४ लाख २० हजार ३० म्हणजेच ५१.३८ टक्के मतदान महिलांचे होते. तर पुरुषांचे मतदान ४८.६२ टक्के होते. २०१४ मध्ये मतदार यादीत नाव असलेल्यांपैकी ७८.८८ महिलांनी मतदान केले होते. २०१४ मध्ये एकूण ७७.०६ टक्के मतदान झाले होते.

२०१९ मध्येही पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला आघाडीवर होत्या. २०१९ मध्ये राज्यात एकूण ८ लाख ५३ हजार ७२४ मतदान झाले होते. यातील ५१.७५ टक्के म्हणजेच ४ लाख ४१ हजार ७८० मतदान महिलांचे होते. तर पुरुषांचे मतदान ४८.२५ टक्के होते. २०१९ मध्ये मतदार यादीत नाव असलेल्यांपैकी ७६.१६ महिलांनी मतदान केले होते. २०१९ राज्यात लोकसभेसाठी एकूण ७५.१४ टक्के मतदान झाले होते.