कर्ज काढण्यासाठी मृत काकालाच व्हिलचेअरवरून आणले बँकेत; महिला जामीनमुक्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 10:00 am
कर्ज काढण्यासाठी मृत काकालाच व्हिलचेअरवरून आणले बँकेत; महिला जामीनमुक्त

रिओ दि जानेरो : ब्राझिलमधील एका महिलेने गेल्या महिन्यात तिच्या मृत काकाला कर्जाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी बँकेत आणल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर ब्राझीलच्या पोलिसांनी संशयित महिला एरिका डिसोझाला अटक केली होती. आता सोळा दिवसांच्या पोलीस कोठडीत होती. आता तिला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. बाहेर आल्यानंतर तिने ‘काका तेव्हा मृत होते, हे कळलेच नाही’, असे स्पष्टीकरण दिले आहे.

पोलीस कोठडीमुळे मी माझ्या कुटुंबापासून दूर राहिले. हे दिवस खूप कठीण गेले. माझे काका मरण पावले होते, हे मला कळलेच नाही. लोक जे माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत, ते योग्य नाही. मी तशी नाही, ज्याबद्दल लोक बोलत आहेत, असे एरिकाने म्हटले आहे. जेव्हा रुग्णवाहिका कर्मचाऱ्याने तपासणी केली तेव्हाच काकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली होती. तेव्हाच मला कळले की काका पाउलो ब्रागा यांचे निधन झाले आहे.

एरिकाने मंगळवार, १६ एप्रिल रोजी ६८ वर्षीय काकांचा मृतदेह  व्हीलचेअरवर बसून बँकेत आणला होता. या मृतदेहामार्फत तिला २.७१ लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे होते. पोलिसांनी एरिकाला तेव्हाच अटक केली होती. ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे ही घटना घडली होती. व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बरी दिसत नव्हती. त्याचे डोके सतत खुर्चीवर टेकते. एरिका वारंवार हाताने डोके सरळ करण्याचा प्रयत्न करत होती. हा प्रकार तेथील सुरक्षारक्षकाने मोबाईलवर शूट केला होता. शिवाय बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता.

दरम्यान, संशयित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी दुपारी जेव्हा कर्ज काढण्यासाठी ती आली तेव्हा येण्यापूर्वी तिने डोकेदुखीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे तिला नक्की काय होत आहे, हे समजत नव्हते. तिला निद्रानाशाच्या विकार असल्याने ती झोपेच्याही गोळ्या घेते. घटनेच्या आदल्या रात्री तिने त्या गोळ्या घेतल्या होत्या. त्याचा परिणाम दुपारपर्यंत होता की काय, हे मला माहिती नाही, असेही तिने म्हटले आहे. बँकेत जाण्याविषयी काकांशी बोलणे झाले होते. त्यांना न्युमोनिया झाला होता. उपचार घेऊन रुग्णालयातून नुकतेच ते घरी आले होते. त्यांनीच बँकेत जाण्याचा आग्रह धरला होता. पण, चालण्याची शक्ती नव्हती म्हणून व्हिलचेअरची मदत घेतली, असे एरिकाने म्हटले आहे. तिचा युक्तिवाद न्यायालयानेही ग्राह्य धरला. तसेच तिची मानसिक स्थिती कमकुवत असल्याचे नमूद करून तिला जामीन मंजूर केला.