सासष्टीत पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान ७.५ टक्क्यांनी जास्त

६७.५१ टक्के पुरुष, ७५.०४ टक्के महिला, तर तृतीयपंथियांचे १०० टक्के मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 12:25 am
सासष्टीत पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान ७.५ टक्क्यांनी जास्त

मडगाव : दक्षिण गोव्यातील विजयी उमेदवार कोण असेल हे ठरवणारा तालुका म्हणून सासष्टीकडे पाहिले जाते. सासष्टीतील मतदानाची आकडेवारी पाहता, ६७.५१ टक्के पुरुषांनी, तर ७५.०४ महिलांनी मतदान केले. साडेसात टक्के जास्त महिला मतदारांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले. मडगावातील चारही तृतीयपंथियांनी हक्क बजावल्याने त्यांचे १०० टक्के मतदान झाले.
दक्षिण गोव्यातील ५९८७६७ मतदारांपैकी ४४५९१६ मतदारांनी मतदान केले असून ७६.०६ टक्के मतदान झाले. यातील सासष्टीचा विचार करता, २००९ मध्ये ६६.८८, २०१४ मध्ये ६८.०९ टक्के मतदान झाले होते व आता यात वाढ होउन ७४.४७ टक्के मतदान झालेले आहे. साधारण ६ ते साडेसहा टक्के मतदानात वाढ झालेली आहे, ही निर्णायक ठरणारी आहे.
नुवे मतदारसंघातील २८५०२ मतदार असून २०१६० मतदारांनी मतदान केल्याने ७०.७३ टक्के मतदान झाले. १३१०० पुरुष मतदारांपैकी ८५८० (६५.४९ टक्के) जणांनी, तर १५४०२ महिला मतदारांपैकी ११५८० (७५.१८ टक्के) मतदारांनी मतदान केले. कुडतरीत ३०५१३ मतदारांतील २१८२३ मतदारांनी मतदान केल्याने ७१.५२ टक्के मतदान झाले. एकूण १४६३४ पुरुष व १५८७९ महिला मतदारांपैकी ९९५४ पुरुष (६८.०१) व ११८६९ (७४.७४) महिला मतदारांनी मतदान केले.
फातोर्डा मतदारासंघातील ३१०३६ मतदारांपैकी २२९५१ मतदारांनी हक्क बजावला व ७३.९५ टक्के मतदान झाले. १४६८६ पुरुष मतदारांपैकी १०७२१ (७३ टक्के) तर १६३५० महिलांपैकी १२२३० (७४.८० टक्के) मतदारांनी मतदान केले. मडगावातील १४७२१ पुरुषांपैकी १०७८४ (७३.२५ टक्के) व १५५४४ महिलांपैकी ११५१३ (७४.०६ टक्के) महिलांनी मतदान केले. तृतीयपंथी चार मतदार मडगावात नोंद असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. ३०२६९ मतदारांपैकी २२३०१ मतदारांनी मतदान केल्याने ७३.६८ टक्के मतदान झाले.
बाणावलीतील २९१३४ मतदारांपैकी १९९५४ जणांनी मतदान केले व ६८.४९ टक्के मतदान झाले. १३७४७ पुरुषांपैकी ८७११ (६३.३६ टक्के) व १५३८७ महिला मतदारांपैकी ११२४३ मतदारांनी (७३.०६ टक्के) मतदान केले. नावेलीतील २९०२९ मतदारांपैकी २०७६५ जणांनी मतदान केले व ७१.५३ टक्के मतदान झाले. १४२३४ पुरुषांपैकी ९६३७ जणांनी (६७.७० टक्के) तर १४७९५ महिला मतदारांपैकी १११२८ जणांनी (७५.२१टक्के) मतदान केले.
कुंकळ्ळीतील १४०७० पुरुष मतदारांपैकी ९४३० जणांनी (६७.०२ टक्के) व १५५८४ महिलांपैकी १२०७४ महिलांनी (७७.४७ टक्के) मतदान केले. एकूण २९६५४ मतदारांपैकी २१५०४ मतदारांनी हक्क बजावला व ही टक्केवारी ७२.५२ टक्के एवढी राहिली. वेळ्ळीत एकूण ३१७०० मतदारांपैकी २२०१९ जणांनी मतदान केले व ६९.४६ टक्के मतदान झाले. १४९४७ पुरुष मतदारांपैकी ९३१० जणांनी (६२.२८ टक्के) तर १६७५३ महिलांपैकी १२७०९ जणांनी (७५.८६ टक्के) मतदान केले.

दक्षिण गोव्यात ७४.४७ टक्के मतदान झाले. त्यात ७२.३८ टक्के पुरुष मतदारांनी व ७६.४३ टक्के महिला मतदारांनी मतदान केले व तृतीयपंथियांच्या मतदानाची टक्केवारी ७७.७७ टक्के राहिली. तसेच सासष्टीतील पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ६७.५१ टक्के, तर ७५.०४ टक्के महिलांनी मतदान केलेले दिसते. बदल घडवण्याची ताकद महिला मतदारांमध्ये असल्याचे म्हटले जाते. सासष्टीसारख्या महत्त्वाच्या तालुक्यातील महिला उमेदवारांची वाढलेले मतदान विजयी उमेदवाराला पोषक असणार आहे.