आचारसंहिता संपलेली नाही... ‘या’ तारखेपर्यंत कायम!

महत्त्वाच्या कामांबाबत निवडणूक आयोग घेणार निर्णय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 12:18 am
आचारसंहिता संपलेली नाही... ‘या’ तारखेपर्यंत कायम!

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मंगळवारी मतदान झाले. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता मात्र ४ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या काळात महत्त्वपूर्ण कामे पुढे नेण्यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्यामुळे आचारसंहिताही ४ जूनपर्यंत कायम असणार आहे. आचारसंहिता काळातील महत्त्वपूर्ण सरकारी कामांना मंजुरी देण्यासाठी सरकारने मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची​ समिती स्थापन केली आहे. सरकारला आता पुढील काळातील महत्त्वपूर्ण आणि तातडीची कामे हाती घेण्यासाठी सरकारला आता या समितीकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सरकारकडून कामांसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर अभ्यास करून ही समिती आवश्यक ते प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारला राज्यभरात मान्सूनपूर्व कामे हाती घ्यावी लागणार आहेत. याशिवाय इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामेही प्रलंबित आहेत. या सर्व कामांचे प्रस्ताव सरकार या समितीला सादर करणार आहे.