लोकसभेसाठी राज्यात ७६.०६ टक्के मतदान!

रमेश वर्मा : पोस्टल बॅलेट मतदानाच्या समावेशानंतर वाढणार टक्केवारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 12:26 am
लोकसभेसाठी राज्यात ७६.०६ टक्के मतदान!

पत्रकारांना माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा.

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ७६.०६ टक्के मतदान झाले आहे. उत्तर गोव्यात ७७.६९ टक्के, तर दक्षिण गोव्यात ७४.४७ टक्के मतदान झाले. यात पोस्टल बॅलेट मतांचा समावेश नाही. पोस्टल बॅलेट मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आल्यावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते. त्यामुळे यंदा लोकसभेत विक्रमी मतदान होऊ शकते, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकी विषयीची आकडेवारी जाहीर केली.
वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा एकूण ८ लाख ९६ हजार ९५८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४ लाख ३१ हजार ८७ पुरुष, ४ लाख ६५ हजार ८६२ महिला तर ९ तृतीपंथीयांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय पाहता उत्तर गोव्यात २ लाख २१ हजार ७० पुरुष, २ लाख २९ हजार ९७० महिला आणि २ तृतीयपंथियांनी मतदान केले. दक्षिण गोव्यात २ लाख १० हजार १७ व २ लाख ३५ हजार ८९२ महिला व ७ तृतीपंथियांनी मतदान केले.
मतदानाच्या दिवशी संपूर्ण गोव्यातून १९ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी करून अहवाल तयार केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेत आयोगाला जनतेकडून आलेल्या सर्व ११९ तक्रारीचा निपटारा करण्यात आला आहे. सी व्हिजील ऍपद्वारे आचारसंहिता भंगाच्या १२२ तक्रारी आल्या होत्या. यातील ११४ तक्रारी १०० मिनिटांच्या आत सोडवण्यात आल्या. याशिवाय १९५० या हेल्पलाईनवर आलेल्या १५ पैकी १५ व अन्य स्वरूपाच्या ३६ तक्रारी सोडवण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले.

४९ ईव्हीएम यंत्रात तांत्रिक अडचणी
वर्मा यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी काही ईव्हीएम यंत्रात तांत्रिक अडचणीच्या तक्रारी आल्या होत्या. यानुसार आयोगाकडून विविध मतदारसंघातील ४९ ईव्हीएम यंत्रे बदलण्यात आली.

१७.८२ कोटींचा मुद्देमाल जप्त
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते ६ मे दरम्यान १७ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ४.७८ लाख रुपये रोख रक्कम, ३.३८ लाख रुपयांचे मौल्यवान धातू, ३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ, १.६२ कोटी रुपयांच्या मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू, सुमारे ४ कोटी ८० लाख रुपयांच्या मद्याचा समावेश आहे.