डान्सबार मालक गजेंद्र सिंगसह चौघांवर आरोप निश्चित

कळंगुट येथील खुनी हल्ला प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 12:28 am
डान्सबार मालक गजेंद्र सिंगसह चौघांवर आरोप निश्चित

म्हापसा : कळंगुट येथे रस्त्यावर बियरच्या बाटल्या फोडत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून रवी पिरणकर व त्याच्या मित्रांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी डान्सबारचे मालक गजेंद्र रौतन सिंग व इतर तिघांवर म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केला. इतर संशयित आरोपींमध्ये विकी राज फर्नांडिस (खोर्ली म्हापसा), रौनक सुभाष पावसकर (कळंगुट) व विनायक कोले (पेडणे) यांचा समावेश आहे. सुनावणीवेळी हे संशयित गैरहजर होते.

ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी पहाटेच्या सुमारास शारनाम ग्रीन रिसॉर्टजवळील टॅक्सी स्टॅण्डनजिक घडली होती. घटनास्थळी संशयित विकी, रौनक व विनायक हे रस्त्यावर बियरच्या बाटल्या फोडत होते. हा प्रकार पाहून फिर्यादी रवी पिरणकर (कळंगुट) आणि त्याचे मित्र वैभव लोटलीकर व गॉडविन मोनीस यांनी संशयितांना रस्त्यावर बाटल्या फोडू नये अशी विनंती केली. त्यावरून संशयितांनी या तिघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली.

यानंतर संशयितांनी त्यांचा पाठलाग करुन लोखंडी सळी, दंडूक यांनी मारहाण केली. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना अटक केली होती.

संशयित गजेंद्र सिंग यांनीच इतर संशयितांना आमच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते, असे तक्रारीत फिर्यादींनी नमूद केले होते. शिवाय संशयित गजेंद्रसिंग यांच्या व्हर्जिन कामा नोव्हा नामक डान्सबारमधून या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली होती. आरोपी हे गजेंद्र सिंग यांच्या डान्स बारमध्ये बाऊन्सर म्हणून कामाला होते व पोलीस चौकशीवेळी त्यांनी मालक सिंग यानेच आपल्याला हा हल्ला करण्यास सांगितल्याची कबुली दिली होती.

दरम्यान, फिर्यादी व त्याच्या मित्रांनी गुन्ह्याच्या अडीच वर्षांनी पोलिसांत प्रतिज्ञापत्र सादर करून गुन्ह्यात नाव असलेल्या गजेंद्र सिंग यांच्यावर खटला चालवण्याची इच्छा नाही. कारण हे प्रकरण सामंजस्याने सोडवले आहे, असे म्हटले. पण हे प्रतिज्ञापत्र गजेंद्र सिंग यांनीच स्वत:हून कळंगुट पोलिसांत सादर केले होते.

न्यायालयात युक्तीवादावेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. रास्टन बार्रेटो तर, संशयित सिंग यांच्यावतीने अॅड. देवेंद्र भारध्वज यांनी युक्तीवाद केला.

फिर्यादी व पीडितांना प्रतिज्ञापत्र देण्यास गजेंद्र सिंग याने जबरदस्ती केली असावी, अशी शंका निर्माण होते. तसेच संशयित गजेंद्र सिंग यानेच वरील संशयित आरोपींना हा हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचा एकंदरित संशय निर्माण होत आहे, असा निष्कर्ष नोंदवून चारही संशयितांविरुद्ध आरोप निश्चितीचा आदेश न्यायाधीश बॉस्को रॉबर्टस् यांनी दिला.