अपहरण, लुबाडणूक प्रकरणी संशयितांची जामिनावर सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:04 am
अपहरण, लुबाडणूक प्रकरणी संशयितांची जामिनावर सुटका

म्हापसा : माडेल-थिवी येथे देय रकमेसाठी सिव्हिल अभियंत्याचे अपहरण व लुबाडणूक प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींची डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.
प्रत्येकी १० हजार रुपये हमी रक्कम व तितक्याच रकमेच्या हमीदारांची हमी, पाच दिवस पोलीस स्थानकात हजेरी, फिर्यादी व साक्षीदारांना धमकावणे, आमिष दाखवणे किंवा साक्षी पुराव्यांत छेडछाड करण्याचा प्र‍यत्न न करणे, मुळ पत्ता न्यायालय व पोलिसांसमोर सादर करणे व चौकशी अधिकाऱ्यांसमोर आवश्यकतेवेळी हजर राहणे, अशा अटी जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने लागू केल्या आहेत.
संशयित आरोपी बलवीर सिंग शिशपाल गुर्जर (३३, रा. थिवी व मूळ राजस्थान), राजकुमार गिरीधरलाला चौधरी (३३, रा. थिवी व मूळ राजस्थान) आणि विरेंदर सुरजीतलाल कुमार (५९, रा. थिवी व मूळ दिल्ली) यांच्या वतीने अॅड. विनायक पोरोब यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
दरम्यान, हा अपहरणाचा प्रकार रविवार दि. २८ रोजी सायं. ४.३० ते रात्री ९.३० दरम्यान घडला होता. फिर्यादी हितेश बाबूलालजी जंगीड (रा. माडेल थिवी व मूळ राजस्थान) यांचे संशयित आरोपींनी ब्रेझा कारमध्ये कोंबून अपहरण केले होते व त्यांच्या हातातील अांगठी, खिशातील ५ हजार रुपये रोकड व मोबाईल फोन असा मुद्देमाल लंपास केला होता.
या प्रकरणी फिर्यादींनी २९ रोजी तक्रार गुदरल्यानंतर दि. ३० रोजी कोलवाळ पोलिसांनी संशयितांना सावंतवाडी-महाराष्ट्र येथे पकडून संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या ३९२, ३६५, ५०६(२) व १२० ब कलमांतर्गत अपहरण व लुबाडणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.