टोमॅटोच्या आडून गांजा लागवड; ब्रिटिश नागरिकाचा जामीन फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:01 am
टोमॅटोच्या आडून गांजा लागवड; ब्रिटिश नागरिकाचा जामीन फेटाळला

पणजी : सुकूर-पर्वरी येथे टोमॅटो व इतर वनस्पतीच्या आडून चक्क गांजाची लागवड करणाऱ्या ब्रिटिश नागरिक जेसन ली इनवुड याला केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने अटक केली होती. संशयित पुन्हा ड्रग्ज तस्करी गुंतल्याचे निरीक्षण नोंदवून म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी संशयित जेसन ली इनवुड याचा जामीन फेटाळून लावला आहे.
एनसीबीच्या गोवा विभागाला सुकूर-पर्वरी येथे राहत असलेला ब्रिटिश नागरिक जेसन इनवुड हा ड्रग्ज तस्करीत पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्यानुसार, एनसीबीचे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय संचालक अमित घावटे आणि अधीक्षक सुजीत कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीने १० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एनसीबीने जेसन इनवुड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून ४० हजार रोख रक्कम आणि ४० ग्रॅम गांजा जप्त केला. याच दरम्यान त्याने टेरेसवर गांजाची लागवड केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, एनसीबीने ३३ गांजाची रोपे जप्त केली. या प्रकरणी इनवुड याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २१ (बी) आणि २२(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला प्रथम एनसीबीची कोठडी दिली. ती संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान संशयित ब्रिटीश नागरिक इनवुड यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या वेळी एनसीबीचे विशेष अभियोक्ता समीर ताळगावकर यांनी बाजू मांडून संशयिताला २०२२ मध्ये एनसीबीने व्यावसायिक ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केल्याची माहिती न्यायालयात सादर केली. त्यावेळी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याच्या फायदा घेऊन संशयित पुन्हा ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर संशयित जेसन इनवुडने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला.