राहुल कुत्रा न्यायला आले, पण प्रचारासाठी नाही : मुख्यमंत्री

भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन


05th May, 11:34 pm
राहुल कुत्रा न्यायला आले, पण प्रचारासाठी नाही : मुख्यमंत्री

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी कुत्रा न्यायला गोव्यात आले; पण काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यास मात्र ते गोव्यात आले नाहीत. यावरूनच काँग्रेस गोव्याला नेहमीच दुय्यम स्थान देत असल्याचे दिसून येते, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने अनेक वर्षे सत्तेत राहून गोव्यासाठी जे केले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत करून दाखवले. गोव्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. गोव्यासह संपूर्ण देशाचा विकास त्यांनी साधला. काँग्रेसच्या काळात देशात केवळ २३० वैद्यकीय महाविद्यालये आणि ७४ विमानतळे होती. आज देशात ७०० पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये आणि १५० विमानतळे कार्यरत आहेत. पंतप्रधान मोदींनी जनतेचे अखंड भारताचे स्वप्न साकार केले. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले. दहशतवादाला मूठमाती दिली. देशाला चांगले प्रशासन दिले आणि आता त्यांनी विकसित भारताचा चंग बांधला आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्रात पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काँग्रेसने नेहमीच जाती-पातीच्या नावावर मते मागितली. भाजप मात्र आजही​ विकासाच्या नावाने मते मागत आहे. जातीधर्मामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान काँग्रेस नेत्यांकडून आजही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एससी, एसटी, ओबीसी भाजपसोबतच !
राज्यातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) तसेच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) केवळ भाजपनेच न्याय दिला आहे. त्यामुळे हे समाज लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच राहतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. प्रकाश वेळीप, रमेश तवडकर, गोविंद गावडे, गणेश गावकर हे एसटी समाजाचे नेते भाजपसोबत आहेत. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी एसटी समाजाला दिला.              

हेही वाचा