धावजी येथे कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:01 am
धावजी येथे कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

पणजी : धावजी-जुने गोवा येथील बेकायदा भंगार अड्ड्यातील प्लास्टिक कटिंग मशीनवर पडल्यामुळे प्रमोद रामू प्रजापती (२०, मूळ उत्तर प्रदेश, सध्या रा. ओल्ड गोवा) या कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी जमीन मालक प्रमोद नाईक याच्यासह भंगार अड्डा चालक मोहम्मद शकील नईमी या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावजी-जुने गोवा येथे प्रमोद नाईक याच्या जमिनीवर मोहम्मद शकील नाईमी बेकायदा भंगार अड्डा चालवत आहेत. त्या ठिकाणी मोहम्मद याने प्लास्टिकचे तुकडे करण्यासाठी मशीन उभारले आहे. सोमवारी (दि.२९) सकाळी ११ च्या दरम्यान मशीनच्या ब्लेडवर प्रमोद रामू प्रजापती हा कामगार पडून गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जुने गोवा पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश भंडारी यांनी जमीन मालक प्रमोद नाईक यांनी त्याच्या जमिनीवर बेकायदा भंगार अड्डा उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल तर भंगारअड्डा चालक मोहम्मद शकील नाईमी यांनी कामगारांना योग्य प्रशिक्षण न देता आणि सुरक्षा उपकरणे न दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.