नदीत उडी मारलेल्या महिलेला कॉन्स्टेबलमुळे जीवदान

कुंकळ्ळीतील घटना : पोलीस कॉन्स्टेबल राजेश वेळीप यांचे प्रसंगावधान


05th May, 08:54 pm
नदीत उडी मारलेल्या महिलेला कॉन्स्टेबलमुळे जीवदान

घटनास्थळी दाखल झालेले पोलीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : जीव देण्याची धमकी देत जाणार्‍या महिलेचे संभाषण कुंकळ्ळी पोलिसांनी ऐकले व त्यानंतर तिचा पाठलाग केला. तिने पुलावरून पाण्यात उडी मारताच पोलीस कॉन्स्टेबल राजेश वेळीप यांनीही उडी घेत तिचा जीव वाचवला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


पोलीस कॉन्स्टेबल राजेश वेळीप
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला सायकलवरून जात होती व ती मोबाईलवर बोलत असताना तिने आपण जीव देण्यासाठी जात असल्याची धमकी दिली. मशिदीनजीक गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक कविता रावत यांनी महिलेचे ते संभाषण ऐकले होते. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल राजेश वेळीप यांना ही माहिती दिली व मागे जाण्यास सांगितले. कॉन्स्टेबल वेळीप यांनी साधारण १ किलोमीटपर्यंत सदर महिलेचा पाठलाग केला. त्या महिलेने कुंकळ्ळी पायराबांध येथे येताच पुलावरून पाण्यात उडी मारली. हे पाहताच कॉन्स्टेबल वेळीप यांनीही तत्काळ तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली व तिला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांच्या गाडीतूनच सदर युवतीला बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात नेले व तिच्यावर उपचार करण्यात आले.
सासरच्या त्रासामुळे जीव देण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून सदर महिलेला विचारणा केली असता, आपल्या विवाहाला ६ वर्षे झाली असून आपणास सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचे तिने सांगितले. ही महिला मूळ येल्लापूर (कर्नाटक) येथील असून सध्या कायरामळ कुंकळ्ळी परिसरात राहत आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळीना बोलावून घेतले असून त्यांचे जबाब नोंद केले जात आहेत.      

हेही वाचा