बस्तोडात ‘हिट अॅण्ड रन’ अपघातात दुचाकीस्वार जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 12:35 am
बस्तोडात ‘हिट अॅण्ड रन’ अपघातात दुचाकीस्वार जखमी

म्हापसा : बस्तोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर हिट अॅण्ड रन अपघात प्रकरणात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महेश बाबू वरक (४१, रा. अडवलपाल-डिचोली) हे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात गुरुवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बस्तोडा ते गिरीच्या दरम्यान घडला. जखमी महेश वरक हे पणजी येथे खासगी नोकरीच्या ठिकाणी आपल्या मोटारसायकलवरून जात होते.
तार जंक्शन ते ग्रीनपार्क जंक्शन दरम्यानच्या पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून ठोकर दिली. यामुळे ते दुचाकीसह महामार्गावर कोसळले व गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस हवालदार उल्हास गावकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. जखमीला रुग्णवाहिकेतून येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे.

या अपघातावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होती. तरीही एकाही वाहनस्वाराने या हिट अॅण्ड रन अपघातातील वाहनाचा क्रमांक नोंद करण्याची तसदी दाखवली नाही.