राज्यातील मतदान केंद्रांवर लिंबूपाण्यासह वैद्यकीय सुविधा

मुख्य निवडणूक अधिकारी : यंदा ८० टक्क्यांहून जास्त मतदान होण्याचा विश्वास


05th May, 11:37 pm
राज्यातील मतदान केंद्रांवर लिंबूपाण्यासह वैद्यकीय सुविधा

पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा. सोबत पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात लोकसभेसाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय सुविधेसह लिंबूपाणी व शीतपेय, थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा ८० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी व्यक्त केला. पणजीत रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहा गीते (आयएएस) आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू (आयएएस) उपस्थित होते.
राज्यात उत्तर गोवा मतदारसंघात ५ लाख ८० हजार ७१०, तर दक्षिण गोवा मतदारसंघात ५ लाख ९८ हजार ९३४ असे एकूण ११ लाख ७९ हजार ८४४ मतदार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत सुमारे ७५ टक्के मतदान झाले होते. यंदा ८० टक्के मतदान होण्याचा विश्वास आहे. उत्तर गोव्यात ८६३ तर दक्षिण गोव्यात ८६२ असे एकूण १,७२५ मतदान केंद्रे आहेत. महिलांसाठी ४० पिंक मतदान केंद्र, पर्यावरणीय स्थिरतेला प्राधान्य देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी २० मिळून ४० मतदान केंद्र आहेत. याशिवाय ११० मॉडेल मतदान केंद्रे, दिव्यांगासाठी पाच मतदान केंद्रे, जुन्या वारसा (हेरिटेज) जागेत असलेल्या मतदान केंद्राचे वेगळेपण टिकवण्यासाठी युनिक मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. अशी राज्यात एकूण २२९ विशेष मतदान केंद्रे आहेत, असेही मुख्य निवडणूक अधिकार वर्मा यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा म्हणाले...
काही मतदान केंद्रांत रुग्णवाहिकांसह वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.
अर्बन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आपत्कालीन सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
आचारसंहिता उल्लंघनाच्या ३१ तक्रारी असून तीन वगळता इतर तक्रारींचे निवारण केले आहे.
नागरी आणि पोलीस सेवेतील प्रत्येकी दोन असे चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
मतदानपूर्व व्यवस्था आणि मतदान प्रक्रियेचे साक्षीदार होण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन संस्थाचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आले आहेत. ते भूतान आणि मंगोलियातील अाहेत.
भूतान आणि इस्रायलमधील पत्रकारही आले आहेत. ते ५ ते ८ मे दरम्यान निवडणूक प्रक्रियेचे साक्षीदार होणार आहेत.
स्थानिक समस्येमुळे मतदानावर बहिष्काराची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांसह इतरांनी संबंधित मतदारांशी चर्चा केली आहे.
राज्यात १६ मार्च ते २९ एप्रिल दरम्यान आयकर, अबकारी, पोलीस व इतर यंत्रणांनी १७ कोटी १२ लाख ९ हजार ९४८ रुपयांची रोख रक्कम, ड्रग्ज, दारू, सोने व इतर वस्तू जप्त करण्यात आली आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रात अधिकारी पाच झाडे लावणार आहेत.
उत्तर गोव्यात वारखंड, दक्षिण गोव्यात वार्का-नावेली जंक्शन आणि काणकोण बायपासजवळील राष्ट्रीय महामार्गावर मतदारांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याची देखभाल वन खाते करणार आहे.
आवश्यक पोलीस दल तैनात : महानिरीक्षक
निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि मैत्रीपूर्ण वातावरणात होण्यासाठी आवश्यक पोलीस दल तैनात केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतदारसंघात क्षेत्रीय तथा पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती केली आहे. इतर अधिकाऱ्यांसह केंद्रीय सशस्त्र पोलीस तुकडी तैनात केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल व इतर गॅझेट नेण्यास बंदी आहे, असे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई यांनी सांगितले.

हेही वाचा