अमेरिकेला भीषण वादळाचा तडाखा... पत्त्यासारखी कोसळली घरे; अनेकजण जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 04:33 pm
अमेरिकेला भीषण वादळाचा तडाखा... पत्त्यासारखी कोसळली घरे; अनेकजण जखमी

ओमाहा : मध्य पश्चिम अमेरिकेत भीषण वादळाने कहर केला आहे. हे वादळ इतके धोकादायक होते की ओमाहा, नेब्रास्का येथे एक इमारत कोसळली असून अनेक घरे पत्त्यासारखी कोसळली आहेत. यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आयोवामध्ये रात्रभर सतत चक्रीवादळ घोंगावत होते. लँकेस्टर काउंटी, नेब्रास्का येथे वादळामुळे व्यावसायिक इमारत कोसळून तीन जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले होते. ओमाहापासून सुमारे ४८.३ किलोमीटर अंतरावरील मिंडन, आयोवा शहराचे या वादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे सोशल मीडियावरील छायाचित्रांतून दिसत आहे.

अमेरिकेतील अनेक भागांत वादळाचा इशारा

अमेरिकेच्या अनेक भागांत प्रचंड विध्वंस होऊनही वादळाचा धोका कमी झालेला नाही. अमेरिकेतील विविध भागांत शक्तिशाली वादळाचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने आयोवा, कॅन्सस, मिसूरी, ओक्लाहोमा आणि टेक्सासच्या काही भागांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काल रात्री झालेल्या वादळामुळे शहरातील शेकडो घरांचे नुकसान झाले, अशी माहिती ओमाहा पोलीस लेफ्टनंट नील बोनाची यांनी दिली आहे.

हेही वाचा