नवनीत राणा यांचे ओवेसी बंधूंना आव्हान; म्हणाल्या, ‘१५ सेकंद पोलीस हटवा...’

असदुद्दीन ओवेसींनी दिले प्रत्युत्तर, ‘१५ सेकंद कशाला, १ तास घ्या’ वाचा सविस्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 12:20 pm
नवनीत राणा यांचे ओवेसी बंधूंना आव्हान; म्हणाल्या, ‘१५ सेकंद पोलीस हटवा...’

हैदराबाद : महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबादमधील सभेत जाऊन असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात वादाची ठिणगी उडाली आहे. ‘१५ सेकंद पोलिसांना हटवले तर दोन्ही भाऊ कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही’, असे विधान राणा यांनी केल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. दरम्यान, ‘१५ सेकंद कशाला १ तास घ्या. काय करता ते बघू’, असे प्रत्युत्तर ओवेसी यांनी दिले आहे.

नवनीत राणा यांनी काल (ता. ८) हैदराबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांच्या पूर्वीच्या एका वक्तव्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. ‘हा लहान भाऊ, मोठा भाऊ आहे ना… लहान भाऊ म्हणतो १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी धाकट्याला म्हणते, १५ मिनिटे कशाला? १५ सेकंद पोलिसांना हटवले तर दोन्ही भाऊ कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही’, असे जाहीर सभेत खासदार यांनी म्हटले आहे.

‘हैदराबादचा पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी निवडणुका’

ही लोकसभा निवडणूक हैदराबादला पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी आहे. यावेळी फक्त मतदान झाले तर ते देशाच्या हिताचे असेल. यावेळी मतदान करायचे असेल तर हैदराबादचे पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी करा. यावेळी जर तुम्हाला मतदान करायचे असेल तर ते माधवी लता या आमच्या सिंहिणीला या देशाच्या संसदेत पाठवण्यासाठी असेल. हैदराबादच्या तमाम हिंदूंना जागृत करण्यासाठी यावेळी मतदान होणार आहे, असे खासदार राणा यांनी म्हटले आहे.