गॅस जोडणी-आधार लिंक ग्राहकांना अनिवार्य नाही : गोवा कॅन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 02:25 pm
गॅस जोडणी-आधार लिंक ग्राहकांना अनिवार्य नाही : गोवा कॅन

मडगाव : कुडतरीत गॅस जोडणी व आधार लिंकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर गोवा कॅनने ग्राहक देत असलेल्या गॅसच्या किमतीमध्ये सबसिडी समाविष्ट नसल्याने एलपीजी गॅस जोडणी व आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती ग्राहकाला केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

कुडतरी आमदारांच्या कार्यालयाकडून कुडतरी पंचायत, ओरा गॅस एजन्सी व मडगाव गॅस डिस्ट्रीब्यूटर यांच्या सहकार्यातून गॅस जोडणी व आधार लिंक करण्यासाठी, ई-केवायसी करण्यासाठी कुडतरी पंचायत हॉलमध्ये १३ ते १८ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केलेले आहे. याबाबत कुडतरीत फलकही लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही गॅस ग्राहकांना त्यांच्या एलपीजी जोडणी व आधार कार्ड लिंक करण्यास भाग पाडू शकत नाही. कारण ग्राहक देत असलेल्या गॅसच्या किमतीमध्ये कोणतीही सबसिडी समाविष्ट नाही, असे गोवा कॅनकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलेले आहे.

आधार कार्ड लिंकेज अनिवार्य करण्यासंदर्भात कोणत्याही सरकारी प्राधिकरणाची कोणतीही अधिसूचना नाही. असे असताना गॅस जोडणी व आधारकार्ड लिंकिंगला ‘अनिवार्य’ म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्यातील भारतगॅस, एचपी गॅस व इंडेन गॅसच्या सर्व एलपीजी डीलर्सना गोवा कॅनने दिलेला आहे. राज्यातील एलपीजी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती केली जात असल्यास [email protected] वर तक्रार करण्याचे आवाहन गोवा कॅनने केलेले आहे.