हणजूणमध्ये कपड्यांचा गाळा भस्मसात होऊन १५ लाखांचे नुकसान, घातपाताचा संशय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 07:03 pm
हणजूणमध्ये कपड्यांचा गाळा भस्मसात होऊन १५ लाखांचे नुकसान, घातपाताचा संशय

म्हापसा : पिकेन, पेडे - हणजूण येथे आग लागून कपड्यांच्या गाळेवजा दुकानासह दुचाकी जळून भस्मसात झाली. या दुर्घटनेत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले असून यामागे घातपात असल्याचा संशय दुकानमालकाने व्यक्त केला आहे.

ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वा. सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान तसेच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दुकान पूर्णत: जळून खाक झाले होते. नंतर दलाचे जवान रामा नाईक, परेश गावस, स्वप्निल नाईक, दत्तप्रसाद सिनारी, प्रितेस महालदार व प्रल्हास कोटकार या पथकाने पाण्याचा फवारा मारून ही आग विझवली. हणजूण पोलीस हवालदार राजेंद्र पाटील यांनी पंचनामा केला.


हणजूण फ्ली मार्केटच्याजवळ रस्त्याच्या बाजूला हे गाळेवजा हंगामी स्वरूपाचे दुकान उभारले होते. या दुकानामध्ये विविध प्रकारचे तयार कपडे मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवले होते. दुकान मालक हनुमंत पवार हे आपल्या कुटुंबियांसमवेत कर्नाटकमध्ये मुळ गावी नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याला गेले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी त्यांचा मुलगाही हे दुकान बंद करून मुळ गावी गेला होता. त्यापासून चार दिवस दुकान बंद होते. या दुकानामध्ये त्यांनी आपली डिओ स्कुटर ठेवली होती.

आगीमध्ये स्कुटर समवेत सर्व कपडे आणि दुकानही जळून भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर हनुमंत पवार हे शुक्रवारी दुपारी हणजूणमध्ये पोहोचले. या दुर्घटनेत आपले १५ लाखांचे नुकसान झाले असून हा घातपाताचाच प्रकार असल्याचा दावा त्यांनी केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गुगल मॅपद्वारे शोधले घटनास्थळ

अग्निशमन दलाला माहिती देणाऱ्या व्यक्तीने ही दुर्घटना कळंगुट - हणजूण रस्त्यावर झाल्याचे सांगितले. त्यानुसार दलाच्या कंट्रोल रूमने ही माहिती पिळर्ण स्थानकाला दिली. दलाचे जवान माहिती देणाऱ्या व्यक्तीद्वारे गुगल मॅपच्या सहाय्याने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा ही घटना हणजूणमध्ये घडली असल्याचे स्पष्ट झाले. गुगल मॅपच्या सहाय्याने घटनास्थळ गाठण्यासाठी दलाच्या जवानांना २० मिनिटांचा अवधी लागला. तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळाले होते.


हेही वाचा