लोकसभा निवडणूक : आतापर्यंत मगोप, काँग्रेसचे सर्वाधिक ७ खासदार

उत्तरेत मगोचा सर्वाधिक ६ वेळा, दक्षिणेत काँग्रेसचा १० वेळा विजय

Story: गणेश जावडेकर। गोवन वार्ता |
06th May, 04:14 pm
लोकसभा निवडणूक : आतापर्यंत मगोप, काँग्रेसचे सर्वाधिक ७ खासदार

पणजी : गोव्यात आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण गोव्यात मिळून मगोप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ७ नेते खासदार झाले आहेत. उत्तर गोव्यात सलग ५ वेळा निवडून आलेले श्रीपाद नाईक हे भाजपचे एकटेच खासदार झाले. दक्षिण गोव्यात मात्र रमाकांत आंगले आणि नरेंद्र सावईकर हे २ नेते आतापर्यंत खासदार झाले.

उत्तर गोव्यात उद्या १६ वी तर दक्षिण गोव्यात १७ वी लोकसभा निवडणूक होत आहे. २००७ साली दक्षिणेत पोटनिवडणूक झाली होती. त्यामुळे तिथे १७ वी निवडणूक होत आहे. आतापर्यंत उत्तर गोव्यात मगोपने सर्वाधिक ६ वेळा तर दक्षिण गोव्यात काँग्रेसने सर्वाधिक १० वेळा विजय मिळविलेला आहे. मगोपचे वैशिष्ट म्हणजे सर्व नेते एकदाच खासदार झालेले आहेत. कोणीही दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. काँग्रेसचे एदुआर्द फालेरो हे ५ वेळा तर फ्रान्सिस सार्दिन हे ४ वेळा निवडून आलेले आहेत. भाजपचे श्रीपाद नाईक हे ५ वेळा निवडून आल्यानंतर आता पुन्हा रिंगणात आहेत.

उत्तर गोव्यात आतापर्यंत पार पडलेल्या १५ लोकसभा निवडणुकांत सर्वात जास्त ६ वेळा मगोने बाजी मारली आहे. त्यानंतर भाजप (५) आणि काँग्रेस (४) यांचा क्रमांक लागतो. दक्षिणेत काँग्रेसने सर्वाधिक १० वेळा, युगो व भाजपने २ वेळा तसेच मगो व युगोडेपा यांनी प्रत्येकी एकवेळा बाजी मारली आहे.  

त्याचअनुषंगाने उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी सलग ५ वेळा (१९९९ ते २०१९) निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. यंदा श्रीपाद नाईक सलग सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या एदुआर्द फालेरो यांनी सर्वाधिक ५ वेळा खासदारकी भूषवली आहे. तरीही त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ श्रीपाद नाईकांच्या कार्यकाळापेक्षा कमीच आहे. फालेरो यांच्यानंतर दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ४ वेळा खासदारकी भूषवली आहे. दक्षिण गोव्यात भाजपचे रमाकांत आंगले (१९९९) आणि नरेंद्र सावईकर (२०१४) हे दोघेच खासदार झालेत.

 एकंदरीत पाहता गोव्यात काँग्रेस (उत्तर गोव्यात ४ आणि दक्षिण गोव्यात ३) आणि मगोचे ७ (उत्तरेत ६ आणि दक्षिणेत १) वेगवेगळे नेते खासदार झालेत. 

गोव्याच्या आतापर्यंतच्या  खासदारांची यादी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष :

* उत्तर गोवा - पीटर अल्वारीस (१९६२), जनार्दन शिंक्रे (१९६७), अमृत कांसार (१९७७), संयोगिता राणे (१९८०), गोपाळराव मयेकर (१९८९), रमाकांत खलप (१९९६).

* दक्षिण गोवा - मुकुंद शिंक्रे (१९६२).

काँग्रेस :

* उत्तर गोवा - पुरूषोत्तम काकोडकर (१९७१), शांताराम नाईक (१९८४), हरीश झांट्ये (१९९१), रवी नाईक (१९९८).

* दक्षिण गोवा - एदुआर्द फालेरो (१९७७, १९८०, १९८४, १९८९, १९९१), फ्रान्सिस सार्दिन (१९९७, २००७, २००९, २०१९), चर्चिल आलेमाव (२००४).

भाजप :

* उत्तर गोवा - श्रीपाद नाईक (१९९९, २००४, २००९, २०१४, २०१९)

* दक्षिण गोवा - रमाकांत आंगले (१९९९), नरेंद्र सावईकर (२०१४).

युनायटेड गोवन्स :

* दक्षिण गोवा - इराज्मो सिक्वेरा (१९६७, १९७१)

युगोडेपा :

*दक्षिण गोवा - चर्चिल आलेमाव (१९९६)

 चर्चिल आलेमाव हे दक्षिणेतून युगोडेपा (१९९६) आणि  काँग्रेस (२००४) या दोन पक्षातून निवडून आलेत. असे करणारे ते पहिले आणि शेवटचेच.

हेही वाचा