रशियन सैन्याला अण्वस्त्रांसह युद्धाचा सराव करण्याचा आदेश जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 02:55 pm
रशियन सैन्याला अण्वस्त्रांसह युद्धाचा सराव करण्याचा आदेश जारी

मॉस्को : गेल्या दोन वर्षांपासून युक्रेनशी युद्ध करत असलेल्या रशिय सैन्याला आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांसह सराव करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे संथ गतीने सुरू असलेल्या या युद्धाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशिया युक्रेनशी दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध करत आहे. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे धोकादायक इरादे पुन्हा एकदा दिसून येत आहेत. त्यांनी रशियन सैन्याला अण्वस्त्रांचा सराव करण्यास सांगितले आहे. युक्रेनच्या सीमेवर तैनात लष्कर आणि नौदलाला हा आदेश देण्यात आला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आज (ता. ६) ही माहिती दिली. या सरावांमध्ये अण्वस्त्रांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या शस्त्रास्त्रांची तयारी कशी करता येईल आणि त्यांचा वापर कशासाठी करता येईल, हे पाहिले जाईल.

पुतिन यांनी हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा रशियन सैन्याने युक्रेन व्यतिरिक्त पाश्चात्य देशांकडूनही धोका असे म्हटले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या कवायतीमध्ये अण्वस्त्रांची तैनाती आणि वापर यांचा समावेश असेल. ही शस्त्रे युद्धात कशी वापरायची आणि ती आघाडीवर कशी तैनात करता येतील, याचा सराव लष्कर करणार आहे. रशियन लष्कराचे म्हणणे आहे की, याद्वारे आम्ही दाखवू इच्छितो की आम्ही आमच्या अखंडतेचे आणि एकतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

आम्हाला पाश्चिमात्य देशांपासून धोका असल्याचे रशियन लष्कराने म्हटले आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक स्तरावर तयारी आवश्यक आहे. पुतिन यांनी अनेकवेळा जे युक्रेनला मदत करत आहेत त्या अमेरिकेसह पाश्चात्य देशांना अण्वस्त्रांची धमकी दिली आहे. अशा स्थितीत अण्वस्त्रांचा सराव करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रविवारी रात्रीच रशियानेही युक्रेनवर ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील ४ लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याच वेळी, युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड भागाला लक्ष्य करत ड्रोन हल्लेही केले आहेत. या हल्ल्यांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा