फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट, कामुर्लीत घराला लागली आग; दीड लाखाचे नुकसान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May, 04:19 pm
फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट, कामुर्लीत घराला लागली आग; दीड लाखाचे नुकसान

भरवणवाडा-कामुर्ली येथे आगीत जळालेला घरातील फ्रिज.

म्हापसा : भरवणवाडा-कामुर्ली येथील भारती चोडणकर यांच्या घराला आग लागून सुमारे १.५० लाखांचे नुकसान झाले. तर म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत ५ लाखांची मालमत्ता वाचवली.

ही घटना आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्वयंपाक खोलीतील फ्रिजला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व नंतर आगीने पेट घेतला. या दुर्घटनेत स्वयंपाक खोलीमधील फ्रिज, मिक्सर, ओव्हन, फॅन, दरवाजे इतर विद्युत उपकरणे जळाली तर खिडक्यांची तावादनेही फुटली.

पहाटे प्रिया चोडणकर ही झोपेतून उठली व बॅडरूममधून बाहेर आली, तेव्हा घरात सर्वत्र धूर पसरला होता. तर स्वयंपाक खोलीतील फ्रिज आगीत जळत होता. लगेच तिने आपल्या मुलांना उठवले व त्यांना घरातून सुरक्षितस्थळी हलवले. नंतर शेजार्‍यांना कल्पना दिली व अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीची झळ गॅस सिलिंडरला लागली नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले.

म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी अशोक परब यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विष्णू गावस, जी. एम. देसाई, परेश मांद्रेकर, साईराज नाईक व प्रशांत सावंत या जवानांनी ही आग विझवली. 

हेही वाचा