उष्णतेचा पारा चढलेला असतानाच पेडण्यात विजेचा लपंडाव; लोक म्हणतात, ‘किती सहन करायचं?’

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
27th April, 03:54 pm
उष्णतेचा पारा चढलेला असतानाच पेडण्यात विजेचा लपंडाव; लोक म्हणतात, ‘किती सहन करायचं?’

कोरगाव : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्रीच्या वेळी उष्णतेमुळे अंगातून अक्षरशः घामाच्या धारा लागत आहेत. अशा स्थितीत पेडण्याच्या वीज कार्यालयाने विजेचा लपंडाव सुरू करत ग्राहकांना चटके देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यापुढचा कहर म्हणजे चौकशी करण्यासाठी कॉल केले तरी कार्यालयात कोणीही कॉल घेण्याची तसदी घेत नाही. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सध्या पेडणे तालुक्यात रात्री सुमारे २ वाजता तसेच दिवसांतून २० ते ३०  वेळा तरी वीजपुरवठा बंद केला जातो. या प्रकाराला लोक वैतागले आहेत. नोकरदार महिलांना सकाळी लवकर उठून जेवण करावे लागते. सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू होत असल्याने त्या हवालदिल झाल्या आहेत. यासंदर्भात जर कार्यालयात फोन केला तर इथे थातुरमातूर उत्तरे दिली जात आहेत. ‘अमूक ठिकाणी झाड पडले आहे’, ‘तमूक ठिकाणी काम चालू आहे’, अशी उत्तरे दिली जात आहेत. वास्तवात या काळात कुठेही वादळ, वारा नाही. तरीही अशा घटना सातत्याने कशा होत आहेत? शिवाय मान्सूनपूर्व कामे अजून सुरू नाहीत. मग, सातत्याने वीजपुरवठा का खंडित केला जात आहे, असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे.

सर्वसामान्य लोकांकडे इन्व्हर्टर किंवा अन्य उपकरणे नसल्याने मोठी पंचाईत होत आहे. विजचे बिल भरण्यास उशीर झाल्यास लगेच खात्याकडून नोटिसा पाठवल्या जातात. मग, जनतेला नीट सेवा का दिली जात नाही? लोकांनी किती सहन करावे? हल्लीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोरजी येथे आले होते. तेथे कार्यक्रम सुरू असतानाच वीज गायब झाली आहे. तसेच ‘मंत्री तुमच्या दारी’ कार्यक्रम असताना हरमल येथील वीज गायब झाली होती. त्यामुळे पेडणे वीज कार्यालयातील कारभाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा