खलाशी अडचणीत असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा फंडा : नाविकांच्या कुटुंबीयांना इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 02:40 pm
खलाशी अडचणीत असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा फंडा : नाविकांच्या कुटुंबीयांना इशारा

मडगाव : बोटींवर कामाला असणाऱ्या नाविकांच्या कुटुंबीयांना फ्रॉड कॉल करत खून, बलात्कार, स्मगलिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांत नाविक अडकला असल्याची खोटी माहिती देत त्यांच्या सुटकेसाठी पैसे पाठवण्यास सांगण्यात येते. अशाप्रकारचे कॉल, ईमेल्स आल्यास सावधगिरी बाळगावी. संबंधित बोटीवरील अधिकाऱ्यांना किंवा नोकरभरती केलेल्या ठिकाणी कळवण्यात यावे. अशा फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगकडून करण्यात आलेले आहे.

नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे निरनिराळे फंडे फसवणूक करणाऱ्यांकडून शोधून काढले जात आहेत. यातच आता नाविकांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, व्हॉटस्अप, ई मेल्स व टेलिकॉल्सच्या माध्यमांतून नाविकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जातो व आपण कस्टम, पोलीस, सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणांतून बोलत असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय बोटीवर कार्यरत खलाशी खून, तस्करी, बलात्कार, अमलीपदार्थ बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांत अडकलेला आहे. त्याला सोडवायचे असल्यास काही आर्थिक रकमेची मागणी केली जाते. अशा प्रकरणांत काहीजणांनी पैसे दिल्याचे निदर्शनास आलेले आहे. बोटीवर असलेल्या नाविकांच्या कुटुंबीयांना अशाप्रकारचे कॉल्स, ई मेल्स किंवा मेसेजेस आल्यास त्यांनी नोकरीच्या प्लेसमेंटच्या ठिकाणी, नाविक कार्यरत बोटीच्या वरिष्ठांना कळवावे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगकडून करण्यात आलेले आहे. गोव्यातून अनेक खलाशी बोटींवर कामाला आहेत. त्यामुळे गोव्यातील नाविकांच्या कुटुंबीयांनाही सजग राहत फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांनी केलेले आहे.