वेश्या व्यवसायप्रकरणी छापा टाकून कळंगुट येथे एकाला अटक

महिलेची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 12:26 am
वेश्या व्यवसायप्रकरणी छापा टाकून कळंगुट येथे एकाला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने कळंगुट येथील एका हॉटेलच्या बाहेर वेश्याव्यवसाय प्रकरणी छापा टाकून डेव्हिड चेट्टियार (५६, उसकई - बार्देश) या दलालाला अटक केली. यावेळी एका महिलेची सुटका करून तिची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट परिसरात राजू नामक व्यक्ती इतर साथीदारांच्या मदतीने वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती गुप्तहेरांनी गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार स्नेहा झवेरी, अशोक गावडे, ईर्शाद वाटांगी, कॉन्स्टेबल महाबळेश्वर सावंत, रुपेश गायकवाड, क्रितेश किनाळकर, गृहरक्षक सुचिता घाडी व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवार, दि. २४ रोजी मध्यरात्री ११.०५ ते गुरुवार २५ रोजी १.१५ या वेळेत मड्डोवाडो - कळंगुट येथील हाॅटेल डाऊनटाऊनच्या बाहेर सापळा रचला. याच दरम्यान पथकाने बनावट ग्राहकद्वारे राजू याच्याशी संपर्क साधून एका महिलेची मागणी केली. त्यानंतर ठरल्यानुसार डेव्हिड चेट्टियार (५६, उसकई - बार्देश) हा एका महिलेला घेऊन त्या ठिकाणी आला असता, गुन्हा शाखेने ताब्यात घेऊन नंतर अटक केली. तर वेश्या व्यवसायसाठी आणलेल्या महिलेची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या महिलेची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी केली.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७०, ३७०(१),(२) आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याचे कलम ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या दलाल डेव्हिड चेट्टियार याला पोलीस कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.