थिवीच्या पंच सदस्याविरुद्ध महिला उपसरपंचाची पोलिसांत तक्रार

गंभीर परिणामाची धमकी, विनयभंग केल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 12:24 am
थिवीच्या पंच सदस्याविरुद्ध महिला उपसरपंचाची पोलिसांत तक्रार

म्हापसा : कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या फाईल्स मंजूर न केल्याच्या कारणावरून थिवीचे सरपंच व उपसरपंचांना शिवीगाळ करून विनयभंग व गंभीर परिणामाची धमकी दिल्याप्रकरणी पंच सदस्य अर्जुन आरोसकर यांच्याविरुद्ध उपसरपंच अॅड. हर्षदा कळंगुटकर यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे हा प्रकार बुधवार दि. २४ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास पंचायत मंडळाच्या मासिक बैठकीवेळी घडला. संशयित पंच सदस्य आरोसकर यांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या फायद्यासाठी त्यांच्या काही वैयक्तिक कामांच्या फाईल्स बैठकीत मान्यतेसाठी सादर केल्या होत्या. या फाईल्स बेकायदेशीर स्वरुपाच्या असल्याने त्या सरपंचांनी नामंजूर केल्या. बैठकीच्या विषय पत्रिकेवर चर्चेनंतर सरपंचांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावेळी संशयित अर्जुन आरोसकर यांनी फाईल्स मंजूर न केल्याबद्दल सरपंचांशी वाद घातला. शिवाय बैठक संपल्यानंतरही त्यांनी सरपंच व मला शिविगाळ करुन गंभीर परिणामाची धमकी दिली तसेच मला बळजबरीने धक्का दिला. यावेळी पंच शिवदास कांबळी व मायकल फर्नांडिस यांनी मध्यस्थी करून हातघाईची पुनरावृत्ती न करण्याची ताकीद आरोसकर यांना दिली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन महिला व एका पुरूष पंच सदस्याने संशयिताला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप फिर्यादींनी केला आहे.

सदर संशयित हा पूर्णपणे त्रस्त, हताश आणि व्यथित झालेला दिसतो. त्यामुळे तो कायदा हातात घेण्याची शक्यता आहे. जर एखाद्या पंच सदस्याने अशा गुन्हेगारी दबावाने सरपंचाला बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडल्यास सरपंचांना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे कष्टाचे ठरेल.

सार्वजनिक कार्यालयाचा वापर करून बेकायदेशीर फाईल्स निकाली काढण्याची सरपंच व उपसरपंचांना धमकी देणे हा एक गंभीर गुन्हा आहे. कायदा हातात घेण्यापूर्वी संशयित पंच सदस्य अर्जुन आरोसकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे उपसरपंच अॅड. कळंगुटकर यांनी पोलिसांकडे केली आहे.

सरपंच, सदस्यांकडून कारवाईची मागणी

या तक्रारीसोबत सरपंच व्यंकटेश शिरोडकर, पंच सदस्य शिवदास कांबळी, मायकल फर्नांडिस, गीता शेळके व प्रिती आरोलकर यांनी या घटनेचा लिखित कबुलीजबाब देत संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोलवाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.