बाळ बेवारस सोडल्याप्रकरणी आईला कोठडी

प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकले होते बोर्डा फातोर्डा परिसरात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 11:46 pm
बाळ बेवारस सोडल्याप्रकरणी आईला कोठडी

मडगाव : बोर्डा फातोर्डा परिसरात प्लास्टिक पिशवीत गुंडाळून दीड महिन्याच्या बाळाला टाकल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चौकशीअंती संशयित प्रियांका फर्नांडिस (३०, रा. मूळ चंदगड, महाराष्ट्र) हिला अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयाने संशयित प्रियांका हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोर्डा फातोर्डा येथे बुधवारी उघड्यावर दीड महिन्याच्या बाळाला टाकल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित प्रियांका फर्नांडिस हिला अटक केली होती. तर महिला पोलिसांनी मुलाला वैद्यकीय उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. फातोर्डा पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत कुटुंबातील व्यक्तींच्या माहितीतील विसंगतीनंतर सखोल चौकशीअंती सदर मुलाच्या आईने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर मुदतीपूर्व प्रसुती झाल्याने सदर बाळाला काही वैद्यकीय समस्या होत्या. त्यामुळे हे मूल आपल्या कुटुंबावर ओझे असल्याची भावना प्रियांका यांच्या मनात आली. त्यामुळेच आपण ते मूल उघड्यावर फेकल्याची माहिती संशयित महिलेने दिली होती. बाळाला उघड्यावर फेकणे व बाळाच्या जीवाला धोका उत्पन्न करणे यासह गोवा बाल संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करत संशयिताला अटक केली होती. संशयित महिलेला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.