पोस्टिंग होण्यापूर्वीच नव्याने भरती झालेल्या कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू

केरी-फोंडा येथे स्कुटरची वीज खांबाला धडक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 09:57 am
पोस्टिंग होण्यापूर्वीच नव्याने भरती झालेल्या कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू

फोटो : रचत सतरकर आणि अपघातग्रस्त स्कूटर.

फोंडा केरी-फोंडा येथे शनिवारी रात्री २.३० च्या सुमारास स्कुटरची धडक वीज खांबाला बसून रचत अशोक सतरकर (२१, रा. अडकोण, बाणस्तारी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. रचत सतरकर नव्यानेच पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झाला होता. पोस्टिंग होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी वाळपई पीटीएस येथे पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्यात रचत सतरकर याला कॉन्स्टेबलपदी नियुक्त करण्यात आले होते. शनिवारी मुख्यालयात जाऊन हजेरी लावलेला रचत सतरकर शनिवारी रात्री मडगाव येथे व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मित्रासोबत गेला होता. केरी येथील मावशीच्या घरी रात्री उशिरा जीए ०५ एन ९६४३ क्रमांकाच्या स्कुटरने तो जात होता. सातोडे केरी येथे पोहोचल्यावर स्कुटरची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला बसली. यात रचित गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला होता. अन्य वाहनातून येणाऱ्या त्याच्या मित्राने अपघातात घडल्याचे पहिल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी रचितला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघाताची माहिती म्हार्दोळ पोलिसांना दिल्यानंतर निरीक्षक योगेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे पाठवून दिला. रविवारी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.
पोलीस प्रशिक्षण घेतल्यानंतर रचत सतरकरची २६ रोजी कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पोस्टिंग मिळाली नसल्याने शनिवारी त्याने पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती. रचित पोलीस बनल्याने त्याचे आई, वडील, भाऊ व बहीण आनंदात होते. नोकरीच्या पहिल्याच दिवशी रचतचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीय हादरून गेले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
हेही वाचा