मांद्रेतील बेकायदा बांधकामाचा पंचायतीकडून पंचनामा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th March, 12:11 am
मांद्रेतील बेकायदा बांधकामाचा पंचायतीकडून पंचनामा

मांद्रे येथील बेकायदा बांधकामांचा पंचनामा करताना सरपंच प्रशांत नाईक. सोबत संदेश सावंत व इतर. इन्सेटमध्ये बेकायदा बांधकाम. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : मांद्रे पंचायत क्षेत्रातील नारोबा मंदिराशेजारी बिगर गोमंतकीयांकडून सीआरझेड कायद्याचा भंग करत बेकायदेशीर बांधकाम सुरू होते. त्या संदर्भात जागरूक युवक संदेश सावंत आणि इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी पंचायत, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रारी सादर केल्या होत्या. त्यानुसार मांद्रे पंचायतीने सोमवारी (दि.२५) सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सचिव व तक्रारदार संदेश सावंत यांच्या उपस्थितीत या बेकायदा बांधकामाचा पंचनामा केला आहे.
सदर बांधकामाचा पंचनामा केल्यानंतर त्याचा अहवाल पेडणे गट विकास अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवर पोहोचवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. नारोबा देवस्थान परिसरात गुप्ता नामक नागरिकांनी हे बांधकाम सुरू केले असून मुख्य रस्ता जो एमडीआर मांद्रे ते हरमल भागात जातो, त्या रस्त्याच्या बाजूलाच हे बांधकाम उभे केले जात आहे. सदर बांधकाम भविष्यात रस्ता रुंदीकरण करताना अडथळा ठरणार असून, संबंधित खात्याने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली अाहे.


मांद्रे पंचायतीने बेकायदा बांधकामांना कोणतेही प्रकारचे परवाने दिलेले नाहीत. अशी बांधकामे ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत, ती रोखण्यासाठी मांद्रे पंचायत पुढाकार घेणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कायदेशीर परवाने घेऊनच बांधकामे करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल._ प्रशांत नाईक, सरपंच, मांद्रे

जागरूक‍ पंचायत मंडळामुळे या बेकायदा बांधकामाचा पंचनामा झाल्याबद्दल समाधान वाटले. अशा बांधकामांना कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय सीआरझेडचे उल्लंघन करून  अशी बांधकामे उभी राहणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने ती रोखणे आवश्यक आहे. _संदेश सावंत, तक्रारदार