विर्डी येथे अवैध दारूची वाहतूक; तिघांवर कारवाई

वाहनासह १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th March, 12:06 am
विर्डी येथे अवैध दारूची वाहतूक; तिघांवर कारवाई

 विर्डी-दोडामार्ग पोलिसांनी जप्त केलेले दारू नेणारे वाहन.

वाळपई/दोडामार्ग : विर्डी येथे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. यावेळी वाहनासह एकूण १ लाख २९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित नव नाझिया उरहमान साबीर सिद्दिकी (२५), सलमान हकीमुद्दिन सिद्दिकी (२२, दोघेही सध्या रा. बेतोडे, फोंडा, व मूळ रा. जरारी-फारुखाबाद, उत्तरप्रदेश) व एक इसम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विर्डी येथील तपासणी नाक्यावर शनिवारी दुपारी १२:२०च्या सुमारास पोलिसांनी टाटा एस टेम्पो या वाहनाची झडती घेतली असता गाडीत प्रत्येकी १३० रुपये किमतीच्या किंगफिशर प्रमियर लेजर बियर ३३० मिलीच्या १५६ बाटल्या, २२० रु. किमतीच्या किंगफिशर प्रमियर लेजर बियर ६५० मिलीच्या २४ बाटल्या व ४५० रु. किमतीच्या मँशन हाऊस फ्रेंच ब्रॅण्डी ओरिजनल कंपनीच्या ८ बाटल्या, अशी एकूण २९ हजार १६० रुपयांची गोवा बनावटीचे बिगर परवाना मद्य आढळले. पोलिसांनी वाहनासह सदर मुद्देमाल जप्त केला. तसेच संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिगर परवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (अ),(ई), ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
सातत्याने बेकायदा दारूची वाहतूक; सरकारचे दुर्लक्ष
गोव्यातून केरी व पर्ये पंचायत क्षेत्रातून महाराष्ट्रातील विर्डी भागात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. येथे चेकपोस्ट नसल्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व खडीची वाहतूकही केली जाते. यामुळे येथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात यावा व अशा बेकायदेशीर घटनांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली असतानाही त्याकडे गोवा सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेवटी महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कडक कारवाई करून मोठा दारू साठा जप्त केला आहे.