बाणावलीत कामगाराचा खून

पत्नी पोलिसांच्या ताब्यात : कोलवा पोलिसांकडून गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th March, 12:02 am
बाणावलीत कामगाराचा खून

श्वानासह तपास करताना पोलीस. (संतोष मिरजकर)

मडगाव : पेडा-बाणावली येथील भाड्याच्या घरात विश्वनाथ सिधनल (३५) या लोंढा कर्नाटक येथील कामगाराच्या खुनाची घटना घडली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. कोलवा पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी विश्वनाथ याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून तपासकाम सुरू आहे.
पेडा-बाणावली येथे भाड्याने दिलेल्या खोलीत मंगळवारी खुनाची घटना घडली. शंकर सिधनल यांनी मुलाचा विश्वनाथ याचा खून झाल्याची तक्रार कोलवा पोलिसांत दिली. कोलवा पोलीस घटनास्थळी आले असता विश्वनाथ याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत मूळ कर्नाटक येथील विश्वनाथ सिधनल हा गोव्यात कुटुंबीयांसह भाड्याच्या घरात राहत होता. तो टाईल्स फिटींगचे काम करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. कोलवा पोलिसांकडून खोलीतील पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तसेच घटनास्थळी असलेले पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. खून कशासाठी व कुणी केला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृत विश्वनाथ याच्या पत्नीला कोलवा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ सिधनल हा मूळ लोंढा-खानापूर (कर्नाटक) येथील रहिवासी असून गोव्यात टाईल्स फिटींगच्या कामासाठी आलेला होता. त्याच्या वडिलांनी विश्वनाथ याच्या खुनाची माहिती पोलिसांना दिली. खुनानंतर साधारणतः २४ तास उलटून गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणी मिळालेल्या पुराव्यानिशी तपास केला जात असून तपास पूर्ण झाल्यावर खुनाबाबतचा गुंता सुटेल, असेही स्पष्ट केले. या खूनप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, विश्वनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.