नावेली परिसरात विजेच्या लपंडावात वाढ

जीर्ण वीजवाहिन्या, वीज साहित्य बदलण्याची गरज

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th March, 11:31 pm
नावेली परिसरात विजेच्या लपंडावात वाढ

मडगाव : नावेली परिसरात पुन्हा एकदा वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विजेचा खेळखंडोबा येथील नागरिकांना त्रासाचा ठरत आहे. नुकत्याच उच्च दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगतपणे टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता; पण काम सुरू होण्यास विलंब होणार आहे. कर्मचाऱ्यांकडून वीज गेल्यास तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. अद्यापही जीर्ण वीजवाहिन्या व जुने झालेले वीज साहित्य बदलण्याची गरज आहे.
नावेली मतदारसंघातील वीज समस्येवर नागरिकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मार्च महिन्यात उष्मा वाढलेला असतानाच वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या भागातील वीज समस्या सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी बंद पडलेले कंडक्टर व काही ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आले होते. तसेच काही जुने व जीर्ण झालेले खांबही बदलण्यात आले आहेत. त्यानंतरही वीज खंडित होण्याचे प्रकार न थांबल्याने अनेक वर्षांपासून न बदललेल्या वीजवाहिन्या बदलण्याची गरज व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी रात्री-अपरात्रीही घटनास्थळी पोहोचतात व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपड करतात. आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यास उपलब्ध साहित्यांतून वाहिन्यांना जोड देत, कंडक्टर बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करतात. त्यामुळे नागरिकांकडून त्यांना दोष दिला जात नाही; पण वीज खात्याने आवश्यक त्या उपाययोजना वेळीच कराव्यात, असे नागरिकांचे मत आहे.
त्यामुळे याचा त्रास नागरिकांना वीज खंडित झाल्याने होत असतो. जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या तुटल्यानंतर त्या बदलण्यात येत नाहीत, तर त्याच वाहिन्यांना वीजवाहिन्यांच्या तुकड्याचा जोड लावून वीजवाहिन्या जोडल्या जातात. त्यामुळे वीज गळतीचे प्रमाणही वाढलेले आहे.

भूमिगत वाहिन्यासाठी ८९ कोटी मंजूर

नावेली मतदारसंघातील वीजवाहिन्यांच्या पाहणीतून अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्या या कित्येक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या असून त्या आता जीर्ण झाल्या आहेत. कंडक्टर व इतर विजेचे साहित्यही जुने झाले असून ते बदलण्याची गरज आहे. पाचही पंचायत क्षेत्रातील उच्च दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन या भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी ८९ कोटींचा खर्च येणार असून त्यालाही मंजुरी मिळाली आहे. आता उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत झाल्या तरीही इतर वीजवाहिन्या जुन्याच असल्याने वीजगळती व वीजवाहिन्यांच्या तुटण्याची शक्यता कायम राहते.                

हेही वाचा