पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून पसरवली खोटी बातमी! सायबर विभागात तक्रार दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 10:00 am
पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून पसरवली खोटी बातमी! सायबर विभागात तक्रार दाखल

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे दक्षिण गोव्यातून भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरल्या आहेत. आता त्यांच्याविषयी गैरसमज पसरवाणाऱ्या बातमीचे स्क्रिनशॉट व्हॉट्सएपवरून व्हायरल केले जात असल्याचे आढळून आले आहे. तशी तक्रार व्ही. एस. धेंपे होल्डिंग्स प्रा.च्या अधिकृत प्रतिनिधी शर्मिला एस. प्रभू यांनी रायबंदर येथील पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात दाखल केली आहे.

‘निवडणुकीनंतर धेंपे आणि अदानी समुहाशी संलग्न होण्याची अपेक्षा’ अशा अर्थाची एक खोटी बातमी व्हॉट्सएपवरून प्रसारित केली जात आहे. त्या बातमीसोबत भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे. वास्तवात पल्लवी या कंपनीच्या धेंपे समुहातील संचालकांपैकी एक आहेत. त्यामुळे ही बातमी अत्यंत खोटी आहे. बातमीत दिल्याप्रमाणे, तसा कोणत्याही कराराचा प्रस्ताव कंपनीने अदानी समुहाला दिलेला नाही. दोन्ही कंपन्यांत कोणताही समझोता झालेला नाही. किंवा दोन्ही कंपन्यांनी कसल्याच प्रकारचा संयुक्त उपक्रम राबवण्याचा विचार केलेला नाही. असे असताना बनावट लेखन करून गैरसमज पसरवणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सायबर गुन्हा शाखेने या तक्रारीवर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांनी अशी पोस्ट प्रसारित करू नये, अशी विनंती प्रभू यांनी केली आहे. 

हेही वाचा