गोव्यात विधानसभेच्या तुलनेत लोकसभेसाठी ‘इतके’ टक्के अल्प मतदान

Story: गणेश जावडेकर |
08th May, 04:23 pm
गोव्यात विधानसभेच्या तुलनेत लोकसभेसाठी ‘इतके’ टक्के अल्प मतदान

पणजी : गोव्यात विधानसभेच्या तुलनेत लोकसभेसाठी कमी मतदानाचा प्रकार यावेळीही कायम राहिला आहे. उपलब्ध नोंदीनुसार, गेल्या (२०२२) विधानसभा निवडणुकीत ७९.६१ टक्के मतदान झाले होते. विधानसभेच्या दोन वर्षानंतर, काल (ता. ७) झालेल्या लोकसभा निवडणुकीत ७५.२० टक्के मतदान झाले. हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी आहे.

इतर राज्यांसह गोव्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने गोव्यात मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात ते किंचित कमी पडल्याचे दिसून येते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ७६.४ टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारीही गाठण्यात अपयश आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७७.०६ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ८२.५६ टक्के मतदान झाले. गोव्यात प्रत्येक पुढच्या निवडणूक मतदान अजिबात वाढलेले नाही. लोकसभेलाही राज्यात विधानसभेपेक्षा कमी मते मिळतात. याची कारणे सांगणे शक्य नाही, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

विधानसभा निवडणूक मतदानाची टक्केवारी

२०१२ - ८२.९४%
२०१७ - ८२.५६%
२०२२ - ७६.६१%

लोकसभा निवडणूक मतदानाची टक्केवारी

२०१४ - ७७.०६%
२०१९ - ७६.४०%
२०१४ - ७५.२०%