ख्रिस्ती लग्नसोहळ्यात मध्यरात्रीपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी हवी : चर्चिल आलेमाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 12:49 pm
ख्रिस्ती लग्नसोहळ्यात मध्यरात्रीपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी हवी : चर्चिल आलेमाव

मडगाव : गोव्यातील ख्रिश्चन धर्मियांच्या लग्नसमारंभाला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी. ध्वनिक्षेपक यंत्रणा (लाऊड स्पीकर) लावण्यास केवळ रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. ही वेळ वाढवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्राशी चर्चा करून ती कालमर्यादा वाढवून घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली.

येथे घेतलेल्या पत्रकार परिषद चर्चिल बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केंद्राकडून परवानगी घेण्याची क्षमता आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला व विकासकामे केलेली आहेत. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांच्या लग्नाला आवश्यक तेवढा वेळ मिळण्याची गरज आहे. ख्रिश्चन धर्मियांच्या लग्नात रात्री उशिरापर्यंत नाचगाणे होते. पण, ध्वनिक्षेप यंत्रणा लावण्याच्या कालमर्यादेमुळे रात्री १० वाजता समारंभ आटोपता घ्यावा लागतो. ही अडचण दूर होण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्याच्या कालमर्यादेत वाढ होण्याची गरज आहे. ही वेळ वाढवून मागितल्यास केंद्र सरकार मुख्यमंत्र्यांना नाही म्हणणार नाहीत, असे चर्चिल यावेळी म्हणाले.

‘लोकांचा मला पाठिंबा, तरी कोणीच प्रचाराला बोलावले नाही’

मी माजी मंत्री तसेच माजी खासदार असून मला काँग्रेसकडून प्रचारासाठी बोलावण्यात आलेले नाही. मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मला लोकांचा पाठिंबा आहे तरी कुणीही प्रचाराला बोलावले नाही, असे चर्चिल यांनी म्हटले आहे.

‘ईव्हीएम बंद पडण्यावर बोलणार नाही’

ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या प्रकारावर बोलताना, ‘मी याआधी ईव्हीएमवर २०१४ मध्ये आक्षेप घेतला होता. पण, त्यावेळी मला कुणीही साथ दिली नाही. आता जे प्रकार होतात त्यावर काहीही बोलणार नाही’, असे चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे.