‘या’ ठिकाणी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 03:51 pm
‘या’ ठिकाणी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री

पणजी : राज्यात सर्वच समारंभांत ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर) लावण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, केंद्रीय ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक लावण्यावर बंदी आहे. गोवा पर्यटन राज्य आहे. गोव्याला ‘वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणून प्रमोट करायचे असेल तर सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

ख्रिस्ती लग्नसोहळ्यात मध्यरात्रीपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी हवी : चर्चिल आलेमाव

माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ख्रिस्ती समाजातील लग्नांना मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपकांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर पणजी येथे दुपारी पत्रकारांनी विचारले असात मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. ‘साऊंड प्रूफ’ जागांवर ध्वनिक्षेपक यंत्रणांची समयमर्यादा रात्री १० नंतर वाढवण्याबाबत विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहाय्याने ध्वनिक्षेपक यंत्रणांच्या समयमर्यादेबाबत काही बदल करता येतील का, याबाबत विचार करत आहोत. तसेच आम्ही बंदिस्त आणि खुल्या मैदानांवर होणाऱ्या समारंभात फरक करून कालमर्यादेबाबत काही बदल करता येतील का, या विषयीही विचार करत आहोत. या प्रश्नी लवकरच तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ख्रिस्ती धर्मियांचे लग्न सोहळे रात्री उशिरापर्यंत चालतात. यावेळी नाचगाणेही होते. मात्र रात्री १० नंतर ध्वनी क्षेपकाला बंदी असल्याने हे कार्यक्रम आटोपते घ्यावे लागतात. यापूर्वी चर्चिल आलेमाव यांच्यासह राज्यातील अन्य ख्रिस्ती धर्मीय आमदारांनी ही कालमर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सासष्टीतील काही आमदारांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकाही केली होती.

हेही वाचा