ईव्हीएमसह मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसला लागली आग!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 03:41 pm
ईव्हीएमसह मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसला लागली आग!

इंदोर : मध्य प्रदेशात मतदानानंतर ईव्हीएम यंत्रांसह मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसला अचानक रस्त्यावरच आग लागल्याने खळबळ माजली. ही बस सहा मतदान केंद्रांवरील साहित्य आणि यंत्रणा घेऊन बैतूलच्या जिल्हा मुख्यालयाचे दिशेने येत असतानाच काल रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

लोकसभेच्या बैतुल मतदारसंघाच्या सायखेडा पोलीस स्थानकाच्या परिसरात घडली. निवडणूक संपवून मतदान केंद्रांवरील कर्मचारी जिल्हा मुख्यालयात परतत होते. अचानक चालत्या बसला आग लागली. बस चालक आणि मतदान कर्मचाऱ्यांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बैतूल, मुलताई आणि अथनेर येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. बसमधील आग विझवण्यात आली आणि आत ठेवलेले मतदान साहित्य बाहेर काढण्यात आले. मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, यातील काही मशीन जळाल्या आहेत. त्यांच्यासोबत ठेवलेले सामान आणि काही पिशव्याही जळाल्या. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्ही पॅटसह सहा मतदान केंद्राचे हे साहित्य होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतुलच्या मुलताई विधानसभेच्या २७५ रजापूर, २७६ डंडर, २७७ गहूबरसा १, २७८ गहूबरसा २, २७९ कुंडाराईत आणि २८० चिखली माळ मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी बसमधून प्रवास करत होते.