एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्सच्या ७० फ्लाइट्स अचानक रद्द! कर्मचारी आजारपणाच्या सुटीवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 01:02 pm
एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्सच्या ७० फ्लाइट्स अचानक रद्द! कर्मचारी आजारपणाच्या सुटीवर

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सकडून विमानाचे तिकीट काढले असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रत्यक्षात दोन्ही एअरलाइन्सना त्यांच्या ७० फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या आहेत. एअरलाइन्सचे अनेक सदस्य आजारपणामुळे रजेवर गेले आहेत. सामूहिक पद्धतीने त्यांनी ‘मेडिकल लिव्ह’ घेतल्यामुळे कंपनीला नियोजित ७० विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनमधील कथित गैरव्यवस्थापनाचा निषेध म्हणून अनेक क्रू मेंबर्स आजारी असल्याचे कारण देऊन सामूहिक रजा घेतली आहे. सोमवारी संध्याकाळपासून अनेक विमान कर्मचारी आजारी पडू लागले आहेत. क्रू मेंबर्सच्या अपुऱ्या संख्येमुळे कोची, कालिकत आणि बेंगळुरूसह अनेक विमानतळांवर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे.

अनेक क्रू मेंबर्सच्या आजारपणाच्या शेवटच्या क्षणी आलेल्या वृत्तामुळे उड्डाणे उशीर झाली किंवा रद्द झाली आहेत. कंपनी इतक्या मोठ्या संख्येने क्रू मेंबर्सच्या आजारपणाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे पथक या समस्येवर लक्ष ठेवून आहे, असे एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी केले आहे. आमच्या केबिन क्रूच्या एका वर्गाने काल रात्रीपासून शेवटच्या क्षणी आजाराची तक्रार नोंदवली आहे, परिणामी काही फ्लाइटना विलंब झाल्याने त्या रद्द झाल्या आहेत. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूसोबत चर्चा करत आहोत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

एअरलाइन्सने प्रवाशांची माफी मागितली आहे. ‘आम्ही आमच्या प्रवाशांची मनापासून माफी मागतो... प्रभावित झालेल्यांना पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या दिवशी बदली तिकीट दिले जाईल. आज उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटवर परिणाम झाला आहे का ते तपासावे’, असे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा