भाजपला उत्तरेत १ लाख, दक्षिणेत ६० हजारांचे मिळणार मताधिक्य : मुख्यमंत्र्यांचा दावा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 03:10 pm
भाजपला उत्तरेत १ लाख, दक्षिणेत ६० हजारांचे मिळणार मताधिक्य : मुख्यमंत्र्यांचा दावा

पणजी : गोव्यात लोकसभेला चांगले मतदान झाले आहे. याचा फायदा भाजपला होणार आहे. यामुळे उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक १ लाख तर दक्षिणेतून पल्लवी धेंपो या ६० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
पणजीत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक उपस्थित होते.

राज्यात उष्णता असून देखील मतदार घराबाहेर पडले, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विकासाबाबत काहीच बोलला नाही. त्यांनी केवळ धर्माच्या , जातीच्या नावे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपवर आणि माझ्यावर खोटे आरोप केले. एसटी किंवा ओबीसी समाजातील एका दोघांना पुढे काढून पूर्ण समाज भाजपविरोधात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मतदार विशेष करून नवमतदार हुशार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे फुटीच्या राजकारण स्वीकारलेले नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष केवळ चार मतदासंघांपुरता शिल्लक आहे. याउलट उत्तर गोव्यात भाजप २० मतदासंघांत तर दक्षिणेत १४ मतदारसंघात आघाडीवर राहिला. दक्षिणेत आम्ही ६ मतदारसंघांत थोडे कमी पडलो. असे असले तरी सांगे, सावर्डे, मडकई, काणकोण, शिरोडा या मतदासंघांतून मिळणाऱ्या आघाडीमुळे आम्ही ही तूट भरून काढू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मतदार काँग्रेसच्या तोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर देतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास तानावडे यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीपाद नाईक यांनी मतदारांचे आभार मानले. ही आपली शेवटची निवडणूक आहे. याबाबत पक्षाला कळवले असून ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर इंडी आघाडी जाईल विस्मरणात!

निवडणूक झाल्यावर सर्वांनाच इंडी आघाडीचा विसर पडणार आहे. त्यातील आपचे दिल्लीचे मुख्यमंत्रीच तुरुंगात आहेत. त्यामुळे यापुढे ही आघाडी राहणार नाही. याबाबत काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. तर अन्य एका पक्षाचे नेते जास्तच आक्रमक होते. त्यांना कदाचित काँग्रेस पक्षाला ‘टेकओव्हर’ करायचे असेल.

हेही वाचा