डॉम्निक, जुआन यांच्या तडीपाराचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द! वाचा कारण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 03:19 pm
डॉम्निक, जुआन यांच्या तडीपाराचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द! वाचा कारण

पणजी : केवळ प्रलंबित आणि सुनावणी सुरू असलेल्या खटल्यांची दखल घेऊन संबंधिताला तडीपार करता येऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने बिलिव्हर्स संघटनेचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जुआन मास्कारेन्हस यांच्या तडीपाराचा आदेश रद्द केला आहे. हा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता.

पा. डॉम्निक विरोधात ९ तर जुआन विरोधात ६ एफआयआर दाखल झाले आहेत. याचाच आधार घेऊन दोघांना उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करावे, अशी शिफारस पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या शिफारशीनुसार तडीपाराचा आदेश जारी केला होता. याला डॉम्निकने राज्याच्या मुख्य सचिवांकडे आव्हान दिले होते. मात्र, त्यांनी तो आव्हान अर्ज फेटाळला होता. त्यामुळे डॉम्निकने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज अंतिम निवाडा देण्यात आला. त्यानुसार केवळ एफआयआर दाखल झाले किंवा खटल्यावर सुनावणी सुरू आहे, अशा स्थितीत तडीपाराचा आदेश देता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. ही माहिती वकील कपिल केरकर यांनी दिली.