गोव्यात ११ ते १४ मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 02:26 pm
गोव्यात ११ ते १४ मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

पणजी : गोव्यात ११ ते १४ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच आज आणि उद्या वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर ८ ते १० मे दरम्यान वातावरण कोरडे राहील, असा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. पणजीत बुधवारी कमाल ३४.२ तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगाव येथील कमाल तापमान ३३.८ अंश व किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस होते.

पणजी येथील सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के तर मुरगाव येथील ७७ टक्के होती. पुढील सात दिवस सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांदरम्यान असण्याची शक्यता आहे. या सात दिवसात हीट इंडेक्स म्हणजेच जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा