मेंदूसाठी घातक ‘वेस्ट नाईल’ तापाचा केरळमध्ये फैलाव! आरोग्य खात्याकडून अलर्ट जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 05:08 pm
मेंदूसाठी घातक ‘वेस्ट नाईल’ तापाचा केरळमध्ये फैलाव! आरोग्य खात्याकडून अलर्ट जारी

तिरुअनंतपुरम : केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्टवर आला आहे. केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये नुकताच अलर्ट जारी केला आहे. तापाची लक्षणे दिसताच सर्वांनी तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी केले आहे. वेस्ट नाईल विषाणूवर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने उपचार आणि लक्षणे रोखणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

केरळमधील ‘जिल्हा वेक्टर कंट्रोल युनिट’ने अनेक ठिकाणांहून नमुने गोळा करण्यात आले आहेत. सर्व नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रोगाचे विषाणू  डेंग्यूसारखेच घातक आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. अद्याप कुठेही हॉट स्पॉट नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोझिकोडमध्ये आतापर्यंत फक्त पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी चार रुग्ण बरे झाले आहेत.एकावर उपचार सुरू आहेत. हा रोग डासांमुळे माणसांमध्ये पसरतो. रुग्णावर वेळीच उपचार न केल्यास या तापामुळे एन्सेफलायटीसही होऊ शकतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. गंभीर प्रकरणांमध्ये हा रोग मृत्यू देखील होऊ शकतो.

वेस्ट नाईल संसर्गाची मुख्य लक्षणे

डोकेदुखी, ताप, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि कमकुवत स्मरणशक्ती ही वेस्ट नाईल संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत.

अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा

शरीर पूर्णपणे झाकले जाईल, अशी कपडे घालणे. मच्छरदाणी आणि रिपेलेंट्स वापरा. तापाची लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टरांकडून उपचार घ्या. आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी केले आहे.

वेस्ट नाईल ताप म्हणजे काय?

वेस्ट नाईल ताप हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. १९३७ मध्ये युगांडामध्ये याच पहिला रुग्ण आढळून आला होता. २०११ मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा असा रुग्ण आढळून आला होता. मलप्पुरममधील एका सहा वर्षांच्या मुलाचा २०१९ मध्ये तापामुळे मृत्यू झाला होता. मे २०२२ मध्ये त्रिशूर जिल्ह्यात ४७ वर्षीय व्यक्तीचा तापाने मृत्यू झाला होता. वेस्ट नाईल विषाणूमुळे घातक न्यूरोलॉजिकल रोग होऊ शकतात.