भारतातील लोकांच्या रंगरूपावर सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त विधान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 02:30 pm
भारतातील लोकांच्या रंगरूपावर सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : ‘भारत हा एक अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे. भारताच्या पूर्वेकडील राज्यातील लोक चायनिज लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडे राहणारे लोक अरबांसारखे दिसतात. उत्तर भारतात राहणारे ब्रिटिशांसारखे गोरे आणि आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. पण काही फरक पडत नाही. आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत’, असे वादग्रस्त विधान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

आम्ही विविध भाषा, धर्म आणि चालीरितींचा आदर करतो. हा तोच भारत आहे, ज्यावर माझा विश्वास आहे. जिथे प्रत्येकाचा आदर केला जातो आणि प्रत्येकजण थोडीशी तडजोड करतो, असेही पित्रोदा यांनी म्हटले आहे.

कोण आहेत सॅम पित्रोदा?

सॅम पित्रोदा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा आहे. दूरसंचार शोधक आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. ते जवळपास ५० वर्षांपासून टेलिकॉम आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. त्यांचा जन्म १९४२ मध्ये ओडिशातील तितलागड येथे एका गुजराती कुटुंबात झाला. सात भावंडांमध्ये पित्रोदा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरातमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडोदराच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. १९६४ मध्ये त्यांनी शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १९६५ मध्ये दूरसंचार उद्योगात रुजू झाले. १९७५ मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध लावला. हे त्याचे पहिले पेटंट होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पेटंट्स दाखल केले. मोबाईल फोनवर बेस्ट ट्रान्झॅक्शन टेक्नॉलॉजीचे पेटंटही त्यांनी दाखल केले होते.