‘या’ देशात सापडत नाही‍ एकही डास, संशोधन सुरू!.. शास्त्रज्ञ झाले चकीत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 11:41 am
‘या’ देशात सापडत नाही‍ एकही डास, संशोधन सुरू!.. शास्त्रज्ञ झाले चकीत

रेक्जाविक : माणसांना हैराण करणारा जीव म्हणजे डास. घनदाट जंगल असो, अथवा गजबजलेले शहर. डास धुमाकूळ घालतातच. रात्री झोपमोड करणारे डास नुसतेच रक्त शोषत नाहीत, तर जीवघेणे रोगही फैलावत असतात. जगभरात दरवर्षी सुमारे १० लाख लोक डासांमुळे आपला जीव गमावतात. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात डास असतातच, असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. पण, यात तथ्य नाही. जगात असा एक देश आहे कधीच एकही डास सापडत नाही. याकडे आता शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे.


जगातील जवळपास सर्वच देशात डासांची दहशत आहे. काही ऋतूंमध्ये ते गायब होतात आणि हवामान अनुकूल होताच पुन्हा माणसावर हल्ले सुरू करतात. पशुंसह माणसांना चावतात आणि जीवघेण्या रोगांना जन्म देतात. पण, असा एक देश आहे जिथे एकही डास नसतो. असा कोणता देश आहे? तुम्ही अंदाज लावू शकता का?

फ्रान्स, स्वित्झर्लंड, आयर्लंड किंवा अमेरिका… नाही नाही, या सर्व देशांमध्ये डास अनुकूल हवामानात दिसतातच. त्यांच्या उपस्थितीमुळे लोकांचे जगणे कठीण होते. पण ‘आइसलँड’मधील लोक याबाबतीत अतिशय भाग्यवान आहेत. कारण येथे एकही डास नाही. जगात रोज मरण्यापेक्षा जास्त डास जन्माला येतात, पण जगात या देशात त्याचा धोका नाही.

आईसलँड हा जगातील एकमेव देश आहे जो डासमुक्त आहे. अंटार्क्टिकाएवढी थंडी नाही. तसेच आइसलँडमध्ये डासांची पैदास करण्यासाठी तलाव आणि सरोवरांची कमतरता नाही. आइसलँडच्या शेजारी- नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलंड, अगदी ग्रीनलँडमध्येही डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मग आईसलँडमध्ये डास का नसतात, हे एक गूढ आहे. आता याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला आहे.


लाखो वर्षांपासून डासांचा जगात उपद्रव

आतापर्यंत शास्त्रज्ञांनी मांडलेला सर्वात आकर्षक सिद्धांत म्हणजे आइसलँडचे सागरी हवामान त्यांना दूर ठेवते. पण, समुद्रकिनाऱ्यावरील देशांमध्येही डास असतातच. जगात डास ३० दशलक्ष वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. जगभरात त्यांच्या ३,५०० हून अधिक प्रजाती आहेत. आइसलँडचे लोक नशीबवान आहेत. ते शांतपणे झोपतात. त्यांना डास चावत नाहीत किंवा त्यांच्या कानाजवळ आवाजही येत नाहीत.

ते कोणत्या वातावरणात वाढतात?

शास्त्रज्ञांच्या मते, ओले आर्द्र वातावरण डासांना आवडते. पण, ते थंडीतही जगू शकतात. आइसलँडचे पाणी आणि माती यांची रासायनिक रचना डासांच्या उत्पत्तीसाठी योग्य नाही. पण का, हे एक रहस्य आहे. शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.


ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही परिस्थिती बदलेल का?

तथापि, वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि परिणामी हवामान बदलामुळे भविष्यात आइसलँडमध्ये डासांची पैदास सुरू होऊ शकते, अशी भीती पर्यावरणवाद्यांना वाटते. आइसलँडमध्ये फक्त एकच जागा आहे जिथे डास आढळतात आणि ते म्हणजे आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जिथे त्यांचे अवशेष वाईनच्या भांड्यात जतन केले जातात.

डास हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले जाते. कारण त्याने चावा घेताच अनेक रोग पसरतात. त्यांच्यामुळे जगात दरवर्षी सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू होतो. प्रौढ डासांच्या संख्येपैकी ३० टक्के दररोज मरतात, परंतु प्रजातींचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी, माद्या बिनदिक्कतपणे अंडी घालून याची भरपाई करतात. नर डास साधारणपणे ६-७ दिवस जगतात. डासांमुळे मलेरिया, लिम्फॅटिक फिलेरियासिस, झिका, वेस्ट नाईल व्हायरस, चिकुनगुनिया, पिवळा ताप आणि डेंग्यू यांसारखे प्राणघातक आजार पसरतात.


फक्त मादी डास चावतात

मानव, त्यांची मोठी आणि व्यापक लोकसंख्या असूनही, सर्व डासांना पूर्णपणे नष्ट करण्यास सक्षम नाही. विशेष म्हणजे ३,५०० हून अधिक ज्ञात डासांच्या प्रजातींपैकी फक्त ६ टक्के प्रजातीच्या माद्या माणसांना चावतात. त्यापैकी अर्ध्याच डासांमुळे माणसांना रोग होतो.

जर जगातून डासांचा नायनाट झाला तर...

जर जगातून डासांचे उच्चाटन झाले, तर त्यांना खाणारे इतर कीटक आणि मासेही कमी होतील. ज्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होऊ शकतो. डासांच्या अनुपस्थितीमुळे परागण संपेल. परागण प्रक्रियेदरम्यान, डास वनस्पतींचे परागकण वाहून नेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन रोपे वाढतात. डासांशिवाय, काही वनस्पती प्रजाती पुनरुत्पादनासाठी संघर्ष करू शकतात, ज्यामुळे पर्यावरणाच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.