निवडणुकीच्या काळात राज्यात पर्यटकांत मोठी घट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 11:53 pm
निवडणुकीच्या काळात राज्यात पर्यटकांत मोठी घट

पणजी : निवडणुकीच्या काळात गोव्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यातील गजबजलेले समुद्रकिनारे ओस पडत आहेत. याशिवाय पर्यटकांच्या घटण्याचा फटका स्थानिक व्यवसायांना बसत आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये एप्रिल आणि मे महिना गेला. ज्या राज्यांतील लोक सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने गोव्यात यायचे, त्यांनी निवडणुकांमुळे स्वत:चे राज्य सोडणे टाळले. याशिवाय, ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आल्याने आठवड्याच्या शेवटी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली. उत्तर गोव्यातील बागा आणि कळंगुटचा समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात फक्त गोव्यातील लोकांची गर्दी होती. तर इतर राज्यातील पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली होती.

गोव्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात येथून सर्वाधिक पर्यटक येतात. तथापि, गोव्यात आठवड्याचा शेवट ‘ड्राय डे’ होता कारण तिन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी निवडणुका झाल्यामुळे राज्यातील पर्यटक गुरुवारी पहाटे घरी परतले. या महिन्यात पर्यटनात झपाट्याने घट झाली आहे. उन्हाळ्यात, पर्यटक बहुतेक गोवा टाळतात. त्याऐवजी ते काश्मीर, कुल्लू आणि मनालीसारख्या थंड हवामानाच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मात्र, निवडणुकीची भर पडल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, असे टुर अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले.