गोमंतकातील संस्कृतीचा आधार करंझोळचा सुप्रसिद्ध चोरोत्सव ३० रोजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 11:12 pm
गोमंतकातील संस्कृतीचा आधार करंझोळचा सुप्रसिद्ध चोरोत्सव ३० रोजी

वाळपई : सत्तरी तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भाग, गोवा व कर्नाटक सीमेवर असलेल्या करंझोळ गावामध्ये साजरा होणारा सुप्रसिद्ध पारंपरिक चोरोत्सव हा गोमंतकातील पारंपरिक संस्कृतीचा मोठा आधार आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. या उत्सवावेळी शेकडो नागरिक चोरोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी वाळपईपासून जवळपास १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागात येत असतात.

यंदा हा उत्सव ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी करंझोळ गावात जाणारा रस्ता गजबजून जाणार आहे. सातेरी ब्राह्मणी देवस्थानच्या आख्यायिकेमुळे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावाने गोवा मुक्तीच्या लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

चोरोत्सवाबाबत वाढते आकर्षण

चोर ही संकल्पना गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये पहावयास मिळते. शिमगोत्सवात चोरांसाठी म्हणून एक दिवस राखून ठेवलेला असतो.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, करंझोळ गावामध्ये सध्या क्षत्रिय मराठा समाजाचे बांधव स्थिरावले आहेत. सदर जागी हेब्बर नावाची रानटी जमात राहत होती. हे हेब्बार लोक अंगाने धिप्पाड आणि संख्येने जास्त असल्यामुळे ते लोकांना वारंवारपणे त्रास देत असल्याने त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न अनेक वेळा करण्यात आला. हेब्बरांकडून महिलांकडे वाईट नजरेने पाहण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याचा विडा या भागातील मराठ्यांनी उचलला. एक दिवस हेब्बरांनी मराठ्यांच्या मुलीकडे लग्नाची मागणी घातली. त्यांचा वाईट व दहशती स्वभावामुळे मराठी समाजाला त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करता आले नाही. तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेत हेब्बरांना कायमची अद्दल घडावी यासाठी एक डाव आखला. त्या दृष्टिकोनातून आपली मुलगी हेब्बरांकडे सून म्हणून पाठविण्यास तयारी दर्शविली. एके दिवशी लग्नाची बोलणी करण्यासाठी हेब्बरांना बोलावण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय येणार नाही याची पूर्वतयारी करण्यात आली. आलेल्या हेब्बरांना नाच गाण्याची मैफल म्हणून रणमाले व जेवणाचा बेत आखला गेला. मराठ्यांची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार या आनंदाने हेब्बरांची सर्व मंडळी या आमंत्रणाला मान देऊन मराठ्यांकडे बोलणी करण्यासाठी आली. बोलणीची तयारी करण्यापूर्वी मराठ्यांनी हेब्बरांवर आक्रमण करून अनेकांना मारले तर अनेक हेब्बर जिवाच्या आकांताने पळून गेले. तेव्हापासून या गावांमध्ये क्षत्रिय मराठ्यांची साम्राज्यशाही रुजली. सदर हत्याकांडात बळी पडलेले हेब्बर म्हणजेच चोर असू शकतात, अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या गावांमध्ये चोरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.

यादिवशी सकाळपासून गावच्या चारही बाजूने असलेले रक्षणकर्ते (देवचार) यांना वाजतगाजत गावात आणून देवळाकडे मानविले जाते. त्यानंतर संध्याकाळी सार्वजनिक सांगणे करून चोर उत्सवाला प्रारंभ होतो. यामध्ये एकूण आठ गडे भाग घेत असतात. पैकी चार गडे डोक्याने तर चार गडे कमरेने खड्डे काढून पुरले जातात तर एक मुड्ड्याची सुवारी म्हणून चोर असतो. तर एक सुळावरचा चोर म्हणून नियुक्त केला जातो. सुळावरचा चोर हा प्रामुख्याने अविवाहित असतो. सातेरी ब्राह्मणी महामाया या देवस्थानाच्या प्रांगणात हा चोरोत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो. चोहोबाजूने कपड्याचे संरक्षण कुंपण घालून आतमध्ये चोरोत्सव साजरा करण्यात येत असतो. टप्प्याटप्प्याने सदर संरक्षक कुंपण काढून चोरोत्सव पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना याचे दर्शन घडविण्यात येत असते. पारंपरिक वादनामुळे चोरोत्सवाला वेगळीच शैली निर्माण होते. चोरोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गावांमध्ये करवल्या यांचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानंतर घोडेमोडणी उत्सव साजरा होतो. करंझोळचे दोन तर कुमठोळ एक असे मिळून तीन घोड्यांची घोडेमोडणी पहाटेपर्यंत साजरी होत असते. दुसऱ्या दिवशी न्हावणोत्सव झाल्यानंतर उत्सवाची सांगता होत असते. संध्याकाळी ७.३० दरम्यान या उत्सवाला प्रारंभ होत असतो. रात्री ९.३० हा चोरउत्सव नागरिकांना पाहता येतो. आतापर्यंत या गावातील नागरिकांच्या एकजुटीच्या बळावर या चोरोत्सवाची पारंपरिकता अजिबात कमी झाली नाही.

सत्तरीच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व राजकीय क्षेत्रात स्थिरावलेली राजकीय मंडळी आपल्या प्रचाराची सुरुवात करताना याच मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून व सार्वजनिक सांगणे करून करतात. शिमगोत्सव म्हटला की गोमंतकीयांना करंझोळ या ठिकाणी होणाऱ्या चोरोत्सवाची आठवण होत असते.


हेही वाचा