हणजूणमध्ये छापा टाकून १२.२३ लाखांचा ड्रग्ज जप्त

इराणी नागरिकाला अटक : गुन्हा शाखेची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 12:36 am
हणजूणमध्ये छापा टाकून १२.२३ लाखांचा ड्रग्ज जप्त

म्हापसा : पिकेन चिवार हणजूण येथे पोलिसांच्या गुन्हा शाखने छापा टाकून १२.२३ लाखांचा ड्रग्ज व ४१ हजारांची रोकड जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी हमीद तेहरीन (४१) या इराणी नागरिकाला अटक केली.

पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी २२ रोजी मध्यरात्री केली. चिवार हणजूण येथे राहणारा संशयित आरोपी ड्रग्जचा विक्री व्यवहार करत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित विदेशी नागरिकाच्या भाड्याच्या खोलीवर छापा टाकला.

झडतीवेळी पोलिसांना २५८ ग्रॅम गांजा, ५२,१९० ग्रॅम वजनाचा चरस, ६.५८० ग्रॅम वजनाचा एमडीएमए मिळून एकूण १२ लाख २३ हजार ८०० रूपये किमतीचा ड्रग्ज तसेच ४१ हजार ३०० रूपये रोख रक्कम सापडली.

हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर करीत आहेत.

विदेशी कायद्याचे उल्लंघन

या प्रकरणातील संशयित आरोपी हमीद तेहरीन या इराणी नागरिकाविरुद्ध विदेशी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अजून एक गुन्हा पोलिसांकडून नोंदवण्यात येणार आहे.