अलगद पावलांच्या वाटा

कदाचित त्या वाटा आता असतील नसतील, परंतु अलगद पावले पडली काय आणि त्या वाटांनी भरभरून आठवणी दिल्या काय. खरंच एक वेगळे आणि समृद्ध असे बालपण या वाटांवर खेळले.

Story: सय अंगणाची |
27th April, 06:22 am
अलगद पावलांच्या वाटा

दुरच्या वाटांनी जवळची स्वप्ने दाखविली. चालता बोलता त्या सहज संपणाऱ्या वाटू लागल्या. ऊन‌ असू‌ दे की पाऊस, कधी थकल्यावर  बसण्यासाठी त्या वाटेची सोबत असायची; तर कधी भर पावसात वेडीवाकडी वळणं घेत अस्वच्छ वाटणारं पाणी अन् त्यात पाय मारत गणवेश भिजवत उशीराने घरी पोहचण्याची ती वेगळीच मजा असायची. 

काजऱ्याकडची वाट, पोस्तावरची वाट, कोळमीकडची वाट, झरीकडची वाट, डंगातली वाट, वरंड्याकडची वाट, माळावली वाट, मसुंडतली वाट, काजीतली वाट या वाटांवरती नुसती पाऊले पडली नाहीत, तर पावले झरवली गेली. काजऱ्याकडची वाट म्हणजे त्यावेळी तेथे पोहचल्यावर वेगळ्याच प्रकारची भीती जाणवायची. तरीही काजऱ्याची फळे उचलून त्यांच्यासोबत खेळत वाट कधी चालून संपायची ते जाणवतही नसे. पॅरागोनच्या त्या चप्पलांना कितीतरी काजऱ्याच्या झाडाचे काटे अर्धवट मोडून राहायचे. मग चप्पल हातात घेत मधून त्याला दुमडायचा प्रयत्न करत तो काटा काढत वाट चालणं म्हणजे जणू काजऱ्याची सोबत असल्यासारखीच. कुणाला न आवडणारा कावळा आणि मला आवडणारा, तसंच कुणाला न आवडणारं काजऱ्याचं झाड माझ्या प्राथमिक शिक्षणादरम्यान चार वर्षे हमखास सोबतीला असायचं. काजऱ्याच्या वाटेनं एक वेगळपण निर्माण केलेले. कालांतराने हॉट मिक्सच्या रस्त्याने पावलांनी मळलेल्या वाटेवर कब्जा केला. अन् काजऱ्याच्या झाडाचाही अंत झाला. आताच्या पिढीच्या वाट्याला ती वाट आलीच‌ नाही. माळावरच्या वाटेवर तर आमच्या बालपणातला खळखळाट तेथील प्रत्येक झाडा-झुडपात सामावलेला. पावसात तामीड या गवताने भरलेला माळ. हाताच्या हातवाऱ्याने तामीड इकडे तिकडे करत वाटेला पुनर्जन्म लागल्यासारखे वाटायचे. जन्या काका, थोरल्या काकांच्या वाड्यात कामाला असलेल्या रमेश काकासोबत म्हशींना दाव्यावरून सोडून चरायला घेऊन जाताना कधी गोमटी, तर कधी वराग म्हशीच्या पाठीवर मला रमेश काका बसवायचे. निरागसपणा मला सतत गोमटी आणि वरागमध्ये आढळायचा. पाठीवर बसवलं की रमेश काका माळाच्या वाटेने निघायचे. नंतर आमच्या मागून हातात भेटेल ती काठी घेऊन तामीडच्या गवतावर आडव्या तिडव्या काठ्या मारत चालणारी माझी मित्रमंडळी असायची. पाण्यात पोहत असल्यासारखं गोमटी म्हशीवर बसून मी तामीडच्या गवतावर पाय झाडत गवत मागे सारायचा प्रयत्न करायचे. तो माळावरच्या वाटेवरचा आनंद वेगळाच असायचा.

सतत मला एकटीला गोमटी नाही तर वरागवर बसवले जाते म्हणून बाकीच्यांना राग यायचा. एक दिवस तर वाढलेल्या तामीडच्या आडोशाला बसून मस्तीखोर मित्रांनी मी गोमटीवर बसल्याचे पाहून गोमटीला बुजवले आणि क्षणात मी गोमटीवरून त्या माळावरच्या वाटेवर पडले, मी कायमस्वरूपी त्या वाटेला मुकले. कारणे वैयक्तिक आणि वेगळी होती. माळावरच्या वाटे इतकाच पोस्तावरच्या वाटेने दिलेल्या आठवणी आजही ज्वलंत आहेत. आई दास काकांकडे कामाला जायची त्यावेळी तिच्याकडे जाण्यासाठी भट काकांच्या दुर्गावरून (दगडांनी रचलेलं कुंपण) उडी घेत दास काकांच्या घरी पोहोचण्याची वाट. ही वाट म्हणजे गोड आंब्यांचा सुगंधच. दास काका वाड्यावरच्या मुलांना कधी घराजवळ घेत नसायचे. दुर्गावर उभे राहून आंब्यावर दगड फेकून आंबे पाडण्यात सर्वंजण पटाईत होते. दास काकांचा आवाज ऐकला की धूम ठोकायची आमची मंडळी. नंतर "पिंक्या पोस्तावल्या वाटवलं आंबं घेऊन ये" सांगून ते नजरेआड व्हायचे. ही वाट एप्रिल-मे महिन्यात आमचीच असायची. आमच्या व्यतिरिक्त वाटेच्या बाजूला असलेल्या झाडावरचे आंबे एखाद दुसऱ्याला मिळाले तर नशीब म्हणायचं त्याचं. 

पोस्तावरच्या वाटेनंतर आमची पाऊले झिजली ती कोळमीवरच्या वाटेवर. फेब्रुवारी महिना संपत आला की काजूच्या बागायतीत काजू मालकाचा प्रवेश सुरू व्हायचा. दुपारच्या अडीच-तीन दरम्यान काजू फिरणे सुरू व्हायचे. मार्च महिना संपत आला की आमची चोरटी पाऊले त्या वनविभागातील कोळमीकडच्या वाटेवर वळायची. चालताना पाल्या-पाचोळ्यांचा आवाज येऊ नये म्हणून चप्पल हातात घेऊन वाट चालत आमचा मुक्काम कोळमीकडे वळायचा तो तिथे असलेल्या आंब्याकडे. नजरेला न भिडणारे ते वृक्ष अफाट फांद्यांनी भरलेले. त्याच्यावर लटकलेले ते कवंडाळ्याच्या फळासारखे आंबे. हिरवा रंग क्वचित दिसायचा. पडताना तो माझ्याकडे पडायचा असंच वाटायचं. आंबे गोळा करताना एकत्रितपणाने केले जात नसायचे. एकट्याने आपली नजर कोळमीकडच्या वाटेवर ठेवायची, दुसऱ्याने काजू बागायतीकडे आणि दोघांनी आंबे गोळा करायचे. चुकूनही आवाज आला तर मागे पुढे न पाहता आंबे घेऊन धूम ठोकायची. रस्यावर पोहचल्यावर एक दीर्घ श्वास घेतल्यावर समजायचं कुणीही नव्हतं. एखाद सरपटणाऱ्या जीवाचा आवाज त्या सुकलेल्या पानांमधून आलेला असायचा. आज कोळमीच्या वाटेवरचा आंबा मोडून पडला. अजूनही त्याला आंबे लागतात. परंतु त्याच्यातील गोडवा चाखण्यात आमच्यासारखे जीवतोड बालपणीचे सवंगडी नाही लाभले त्याला. आज रस्त्यावरून दिसणारी कोळमीकडची वाट अदृश्य झालेली दिसते.

डंगातली वाट (पूर्वी घनदाट जंगल) तर नकोशी वाटणारी. जणू ऊन्हात त्या वाटेने जळल्यासारखं वाटायचं. परंतु चुरणं, कणेरी, चाफ्रावर फडशा पाडताना या वाटेने ऊन्हापेक्षा सुख दिलं. डंगातल्या वाटेवर आमचाच मुक्काम जास्त. संध्याकाळी गुरे-म्हशी, तर भर दुपारी डंगातल्या वाटेवर  आमचा मुक्काम. वाटेने जाताना असोळे तोंडात चघळत ती वाट फिरायचो. काजीतल्या वाटेने तर डोकऱ्यावर लाकडांची मोळी ठेवली. खटखट आवाजाने काजीतली वाट दुमदुमायची. दुपारचं जेवण झाल्यावर उसांत न घेता काकी, आकु, मावशी, थोरली बाया, डोक्यावर तुवाल्याची चुंबळ घेऊन त्यावर कोयता ठेवून एकमेकींना मागे वळून पाहत गप्पा मारत त्या भरदुपारी जळवणीसाठी लाकडे आणायला जायच्या. काजीतली वाट जणू त्यांच्यासाठी काही क्षणांसाठी का असेना, एकमेकींना साद घालण्यासाठीच असायची. या वाटा आता नवीन पावले शोधत आहेत. कदाचित त्या वाटा आता असतील नसतील, परंतु अलगद पावले पडली काय आणि त्या वाटांनी भरभरून आठवणी दिल्या. एक वेगळं बालपण या वाटांनी दिलं.

पडली पाऊले झिजली वाट

त्या वाटांनी दिली एक नवी पहाट...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.