डिहायड्रेशन

एप्रिल, मे महिना म्हणताच गर्मीचा विचार मनात येऊन दरदरून घाम फुटतो. सतत उन्हात राहिल्याने डोकेदुखी, ताप येणे, अशक्तपणा, जेवण न जाणे यासारखे त्रास अनेक जणांना होऊ शकतात. यासोबतच सुरू होणारा एक महत्त्वाचा त्रास म्हणजे 'डिहायड्रेशन'. यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. वेळीच उपचार न केल्यास डिहायड्रेशनचा त्रास वाढतो आणि धोकादायक ठरू शकतो.

Story: आरोग्य |
20th April, 07:34 am
डिहायड्रेशन

डिहायड्रेशन म्हणजे जेव्हा शरीर आपण सेवन केल्यापेक्षा जास्त द्रवपदार्थ गमावते आणि शरीराला सामान्य कार्ये पार पाडण्यासाठी पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थ मिळत नाहीत. अशा वेळेस पाणी गमावण्यासोबत, पाण्याचे अधिक सेवन होत नसल्यास मीठ आणि पोटॅशियम यासारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीर गमावते, जे श्वास घेणे, हालचाल करणे, बोलणे, सक्रिय राहणे व इतर गोष्टी करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक असते.

डिहायड्रेशनची कारणे

उन्हात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते.

 शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील मिनरल्स, इलेक्ट्रोलाईड्स, सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता होते व डिहायड्रेशन होऊ शकते. 

डिहायड्रेशनची लक्षणे 

तोंडातून दुर्गंधी येणे : आपल्या लाळेमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. डिहायड्रेशनमुळे आपले शरीर पुरेशी लाळ बनवू शकत नाही. यामुळे तोंडात बॅक्टेरियाची वाढ होऊन श्वासाची दुर्गंधी येऊ शकते व तोंड कोरडे दिसू शकते. याच कारणामुळे बहुतेक जण सकाळी दुर्गंधीयुक्त श्वासाने उठतात. झोपेच्या वेळी लाळ कमी तयार होते आणि रात्रभर बॅक्टेरियाच्या वाढीमुळे तोंडाला विचित्र चव आणि घाण वास येऊ शकतो. अशा वेळेस रिहायड्रेट होणे गरजेचे असते. 

कोरडी किंवा लालसर त्वचा : डिहायड्रेशनमुळे जेव्हा शरीरात पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा त्वचेतही पाण्याची कमतरता जाणवून येते. त्वचा कोरडी, फ्लॅकी होऊ शकते, खाज सुटू शकते आणि निस्तेज दिसू शकते. हवामानातील बदल, चुकीचा आहार व जीवनशैलीतील चुकीच्या सवयी जसे की मद्यपान किंवा कॅफिनचे सेवन त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. 

मसल क्रॅम्प्स : उन्हामुळे व वाढलेल्या तापमानामुळे आपल्याला जितके जास्त गरम होते, तितकेच त्याचा प्रभाव स्नायूंवर पडू शकतो. उष्णतेमुळे मसल क्रॅम्प्स म्हणजेच स्नायूंत गोळे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस जेव्हा स्नायूंची हालचाल वाढते तेव्हा हळूहळू उष्णतामुक्त होऊन सोडियम आणि पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्समधील बदलांमुळे देखील स्नायूमध्ये क्रॅम्प्स होऊ शकतात. 

गोड खाण्याची इच्छा : जेव्हा शरीराला डिहायड्रेशनमुळे पाण्याची गरज भासते, तेव्हा शरीरातील अवयवांना संचयित ग्लुकोजचे ग्लायकोजेन घटक आणि ऊर्जेचे इतर घटक सोडणे कठीण होऊ शकते. अशा वेळेस जलद उर्जा मिळवण्यासाठी शरीराला साखरेची जरज भासू शकते. या दिवसांत गोड खाण्याची इच्छा झाल्यास भरपूर पाण्याचे सेवन करावे.

वरील लक्षणांसोबत गर्मीमुळे डिहायड्रेशन होऊन घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे, निस्तेज होणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, अन्न कमी खावेसे वाटणे ही काही डिहायड्रेशनची लक्षणं आहेत. डिहायड्रेशनने मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, बी.पी. कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे हे दिसून येऊ शकते. 

डिहायड्रेशनवर उपाय

डिहायड्रेशन झाल्यावर पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे असते. सतत पाणी प्यावे. दिवसभरात सर्वसाधारपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात पाण्याची गरज भासू शकते. संत्री, मोसंबी, किवी, टरबूज, खरबूज, द्राक्षे अशी पाणी जास्त असणारी फळं जास्तीतजास्त खावीत. डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. रोजच्या जेवणात दही किंवा ताक घ्यावे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर