खुल्या आकाशाखालची ती रात्र…

प्रत्येकाला राहण्यासाठी छप्पर हे हवचं असतं. सोळा-सतरा‌ वर्षापूर्वीचं‌ बालपणीच ते घर आठवलं‌ की न सांगण्या इतपत त्या भयाण आठवणी नजरेसमोर तरळू लागतात. त्यानंतरही अगदी हल्लीपर्यंत घराचा साचा तोच‌ आणि तसाच होता. फक्त त्यातल्या आठवणींत जमीन आसमानाचा फरक होता.

Story: सय अंगणाची |
20th April, 04:43 am
खुल्या आकाशाखालची ती रात्र…

वाड्यावर सगळ्यात शेवटचं‌ घर आमचं‌ होतं. घराच्या उजव्या बाजूने गावात जाणारा मातीचा रस्ता, डाव्या बाजूला आब्यांच झाड अन् त्याच्या अवतीभोवती असलेली इतर झाडे... डाव्या बाजूला कधी जास्त जाणं होतं नसे. कारण ती आम्ही राहत असलेल्या जमीन‌ मालकाच्या कितीतरी पिढ्यांची‌ स्मशानभूमीची जागा होती. संध्याकाळी तिन्हीसांज झाली की रातकिड्यांची किरकिर सुरू‌ व्हायची अन् एक भितीदायक असं वातावरण सतत घराच्या अवतीभोवती असायचं. कौलारू घरं, कुड्याच्या काठ्यांनी एकमेकांत केसांच्या वेणीसारखा घराच्या चौफेरी घातलेला कुड. झोपेपर्यंत प्रकाश देत तेवणारी दिव्यातील वात यांचीच साथ लाभायची. 

बांबू फोडून‌ त्यापासून तयार वेणीसारखं तयार केलेलं दार दोराच्या सहाय्याने त्या लाकडी कुडाच्या भिंतीला बांधलेलं. आम्ही‌ राहत असलेल्या जागेला 'माळावं‌' (मळ) म्हणायचे. ताई-माई त्यावेळी कामानिमित्त बाहेर राहायच्या. घरात मी आणि आई जास्त असायचो. भीती तेथील वातावरणाची वाटत नसायची, तरी एका वेगळ्याच वैयक्तिक भितीने मी आईच्या अवतीभोवती फिरत राहायचे. झोण्यासाठी अंथरूणावर पडल्यावर पहिल्यांदा गोधडीचं झाकण डोळ्यांवर पडायचं. नाहीतर रात्रभर त्या लाकडी कुडाच्या लहानशा छिद्रातून बाहेर पाहत राहायचे आणि अलगद आईच्या कुशीत‌ शिरल्यावर गार पडलेल्या शरीराचा स्पर्श होताच आई डोक्यावरून  हात फिरवत, माझी बाहेर असलेली नजर आपल्याकडे फिरवत मला झोपायची. 

ते दिवस आता चार भिंतींआड आठवू लागले की, अंगावर जणू शहाराच येतो. मला रात्रीचा बाहेरचा प्रकाश दिसू नये, माझी भीती दूर होण्यासाठी आईने संपूर्ण लाकडी कुडाला मातीने लपेटले... कालांतराने दिवस सरू लागले आणि ज्यांच्या जाग्यात आमचं कौलारू घर होतं, त्यांचं आणि बाबांचं बिनसलं आणि तेथून संसार दुसऱ्या ठिकाणी थाटण्याचा प्रसंग आईसमोर उभा राहिला. कुणाच्या ओळखीने आता आम्ही राहत असलेली जागा कमी दरात असल्याची बातमी बाबांच्या कानी पडली. मध्यंतरी  बाबा आणि जागा मालकात वादाची ठिणगी वेगाने पेट घेत होती. बाबांनी रागाच्या भरात गवत आणि पोफळीच्या चुडतांच्या छप्पराची राखरांगोळी केली. वरती शुभ्र आकाश आणि बाजूला कुड एवढचं‌ त्या वाद विवादाच्या काळात शिल्लक राहिलेलं‌. 

दुसरी जागा बाबांनी घेतली‌ परंतु एका ठिकाणावरून सरळ दुसऱ्या जागी जाण्यासाठी पहिल्यांदा राहण्याची व्यवस्था करणे गरजेचं होतं. त्यासाठी थोडा वेळ म्हणावा तसा गेलाच. दिवसाच्या वेळी आई उन्हापासून संरक्षण करण्यासाठी साडी लाकडी मेडींना‌ (लाकडी खांब) बांधायची. त्याकाळात घराला पाहताच क्षणी रडू कोसळायचं. जणू बेघर झाल्यासारखं‌ वाटायचं. वाड्यावरचे इतरजण झोपायला आपल्या घरी आपुलकीने बोलवायचे परंतु, "आमचं नवीन घर होणार आहे लवकर" असं सांगून मी जाणे टाळायचे. सहा-सात दिवस खुल्या आकाशाखाली झोपणं आता एखाद्याला सांगताना त्यांना तशी झोप हवीशी वाटू लागते. परंतु त्या दिवसातील वेदना मात्र असह्य होत्या. उन्हाळ्यातील ते दिवस, रात्री येणारी वाऱ्याची झुळूक एखाद्याला निवांत झोप देणारी असावी परंतु आसवांनी भरलेली ती रात्र नकोशीच वाटायची. 

अखेरीस दुसऱ्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था बाबांनी केली. दुसऱ्या दिवशी ती जागा, तो गाव सोडून कायमस्वरूपी एका नव्या ठिकाणी आपण जाणार याची कल्पना बाबांनी दिली. त्या संध्याकाळी मात्र भीती नावाची गोष्टच नाहीशी झाली. मी आईला सोडून बाहेर बसून होते. घराच्या मागच्या बाजूला अर्धी मोडून पडलेली किंदळ होती. त्यावर आईने लावलेल्या घेवड्याच्या वेलीने आपले स्थान प्रस्थापित केलेले होते. वरून खुल्या आकाशातला तो चंद्र त्या घेवड्याच्या फुलांना जणू आकर्षित करत होता. माझी नजर सहज त्या दृश्याकडे वळली अन् डोक्यात कसलाही विचार नसताना न थांबणारे हुंदके मला येऊ लागले. एरवी कधी एकटक नजरेने न पाहिलेल्या चंद्राला जणू त्या ठिकाणच्या शेवटच्या रात्री मला भेटावसं तर नसेल ना वाटलं? 


या प्रश्नांची पोकळी आता जाणवते. त्या रात्री मला सावरताना आईसुद्धा आतून तुटलेली. "नव्या गावी नवे अनुभव, अवतीभोवती नवीन‌ माणसं असतील... तुला भितीही वाटणार नाही." असं सांगून ती माझी समजूत काढत होती. अखेर सगळ्या सामनाची आवराआवर तिने एकटीनेच केली. एखाद्या वस्तूला हात लावून ती जाग्यावरून हलवणे म्हणजे दंश झाल्यासारखे वाटायचे. अनेक आठवणींनी मन भरून येत होते. त्यादिवशी आईपासून थोडी दूरच झोपले. झोप नको होती. कदाचित आईही जागीच असायची त्या दिवसांमध्ये. रात्रभर छप्पर नसलेल्या घरातून‌ चंद्राला पाहत असताना‌ जणू प्रकाशाचं‌ छप्पर सोबत होतं. मध्यरात्री डोळे बंद झाले खरे, पण जागृत डोळ्यांची झोप कधीचीच उडालेली. कुणीतरी रडत आहे असं जाणवू लागले. आईला हाक माराविशीही वाटली नाही. आसवांनी मी ओलीचिंब होऊन गेलेले. 


कुणीतरी रडतंय असंच जाणवत असताना‌ वाऱ्याची झुळूक एकामागून एक येऊ लागली. त्यातच कुणीतरी आपल्या घराच्या बाजूने चालतयं असं जाणवू लागलं. भीती वाटत नव्हती. तो आवाज ऐकावासा वाटू लागला. चालणारी पावलं जवळ येत असल्याचा भास झाला आणि झोपेतून मी उठून बसले. घामाने चिंब भिजलेले. ती पावलं आता मोठ्याने घरामागून रस्त्याच्या दिशेने जाताना ऐकू येऊ लागली. माझ्या श्वासोच्छवासाचा आवाज आईपर्यंत पोहोचला असावा त्यामुळे भितीने आईही उठली. "लेकी भिऊ नकोस" हे शब्द नकळत माझ्या कानी पडले. मी आईला सांगितले, त्यावेळी आई म्हणाली दुपारा गेलतीस तवा खायल्यांच्यानी कुनी म्हतलं आसन, "लेकी भिऊ नकोस. तेच तुज्या दोयीत उरलं आनि काय नाही. नीज तू. सकाळी आमाना जायायी." मी पुन्हा अंथरूणावर पडले खरी, परंतु खुल्या आकाशाखालची ती रात्र आजही प्रश्न बनून आठवू लागते. एरवी कधी चुकूनही न‌ पाहिलेल्या चंद्राला त्यादिवशी एवढी न्याहाळत बसले की, आज चंद्राला पाहताना त्या रात्रीचं चित्र तसंचं तसं चंद्रामध्ये दिसू लागतं.

खुल्या आकाशाने दिले मजला 

जगण्याचे धागे...

सतत नसला सोबतीला तरी  

अखेरीस...

चंद्र बनला प्रकाशाचा पाठीराखा


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.